विक्रोळी रेल्वे स्थानकाकडे कानाडोळा

विविध समस्यांनी प्रवाशांची फरफट, अपघाताचे प्रमाणही सर्वाधिक
विक्रोळी रेल्वे स्थानकाकडे कानाडोळा

मध्य रेल्वेवर कधी तांत्रिक बिघाड, तर कधी रेल्वे उशिराने या समस्या आता रोजच्याच झाल्या आहेत. विविध स्थानकांतील समस्या सातत्याने समोर येत असताना मध्य रेल्वे प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील विक्रोळी स्थानक यापैकीच एक. गर्दीच्या आणि महत्त्वाच्या स्थानकात गेल्या अनेक महिन्यांपासून असुविधांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. केवळ एक एस्केलेटर स्थानकात असल्याने ज्येष्ठ प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दिव्यांग प्रवाशांसाठी स्थानकात ना उद्वाहक आहे, ना शौचालयाची सुविधा. दुसऱ्या बाजूला प्रतिदिन स्थानकात अपघात घडत असून गतवर्षी ५८ अपघात तर २० हून अधिक प्रवाशांच्या आत्महत्येचे प्रकार विक्रोळी स्थानकात घडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे प्रवाशंकडून मध्य रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनानंतर काहीशी प्रवासी संख्या घटली असतानाच सद्यस्थितीत मध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या जवळपास ६० लाखांवर पोहोचली आहे. मात्र अनेक स्थानकांवरील सोयीसुविधांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्यात पादचारी पूल, स्थानकातील एस्केलेटर, शौचालय या समस्या गंभीर ठरत आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा ताण सर्वच स्थानकांवर येत असून तीच गत विक्रोळी येथे अनुभवायला मिळत आहे. ​विक्रोळी येथील रेल्वे फाटकात अनेक अपघाती मृत्यू होत असल्याने आणि हे फाटक रेल्वेच्या परिचालनात मोठा अडथळा ठरत असल्याने रेल्वेने ते २०११ मध्ये बंद केले होते. मात्र तरी देखील स्थानकात अपघात सत्र सुरू आहेत. रूळ ओलांडणे, लोकलमधून तोल सुटणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागून, खांबांना धडक बसून आणि गाड्या-प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये अडकून झालेल्या अपघातांचा यामध्ये समावेश आहे. गतवर्षी ५८ हून अधिक अपघाती मृत्यू तर २० हून अधिक आत्महत्या या स्थानकात घडल्याची माहिती विक्रोळी येथील रेल्वे अधिकाऱ्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवरून देण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूला विक्रोळी स्थानकाबाहेरही फेरीवाले आणि अन्य दुकानांमुळे स्थानकाबाहेर पडणे प्रवाशांना कठीण ठरत आहे. त्यातच रिक्षांसाठी लागणाऱ्या रांगांमधून वाट काढत स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. प्लॅटफॉर्म क्रमांक एकला जोडलेल्या स्कायवॉकमुळे प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, फलाट क्रमांक चारच्या दिशेला असलेला पूल चिंचोळा असून हा प्रामुख्याने पूर्व भागातील टागोरनगर परिसरातील रहिवाशांसाठी उपयोगाचा आहे. मात्र वाढत्या गर्दीसाठी फलाट क्रमांक दोन आणि चार येथे सरकते जिने आवश्यक आहे.

पुलाचे बांधकाम चुकीचे

फलाट क्रमांक चारवर सीएसएमटीच्या दिशेने बांधलेल्या पुलाने समस्येत भर पडली आहे. या पुलाची चढण कठीण असल्याचा अनुभव विक्रोळीकरांना नेहमीच येत आहे. हा पूल बांधताना रेल्वे प्रशासनाने त्याचा विचार का केला नाही, असा सवाल प्रवासी करत आहेत. यामुळे या पुलावरून ये जा करताना ज्येष्ठ प्रवासी, गरोदर महिलांना दैनंदिन त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे याठिकाणी एस्केलेटर उभे करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

समस्यांसाठी प्रवासी, संघटनांकडून आंदोलन

गेल्या काही वर्षांत विक्रोळी उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊनही मध्य रेल्वेने विक्रोळी स्थानकाकडे हवे तेवढे लक्ष दिले नाही. ही बाब लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी बॉम्बे कॅथलिक सभा आणि विक्रोळी येथील रहिवाशांनी धरणे आंदोलन आणि अंशकालीन उपोषण केले. या रहिवाशांनी रेल्वे, तसेच प्रशासनाकडे १२ मागण्या सादर केल्या. यात रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर त्या जागी पूल उभारण्याच्या मागणीपासून रेल्वे मार्गाला समांतर रस्ता बांधण्यापर्यंतच्या अनेक मागण्यांचा समावेश करण्यात आला होता.

दिव्यांग, गरोदर महिलांचा विसर

विक्रोळी स्थानकात फलाट क्रमांक १वर गेल्या अनेक महिन्यांपासून दिव्यांग प्रवाशांसाठी शौचालय उभारण्यात येत आहे. मात्र या कामाची गती पाहता पुढील आणखी दीड ते दोन महिने हे शौचालय पूर्णत्वास जाणार नसल्याचे दिसून येत आहे. याच फलाटावर सर्वसामान्य प्रवाशांसोबत दिव्यांग प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांसाठी उद्वाहक उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु याबाबत माहिती घेतली असता हे अर्ध्यात थांबले असल्याची माहिती प्राप्त झाली. यामागचे नेमके कारण सांगण्यास स्थानक स्टेशन प्रबंधक यांनी नकार दिला असून दिव्यांग, गरोदर महिला प्रवासी, ज्येष्ठांचा पूर्णपणे विसर मध्य रेल्वे प्रशासनाला पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

प्रवाशांच्या प्रमुख मागण्या

- दिव्यांग प्रवाशांसाठी तात्काळ शौचालय सुरू करावे.

- अर्धवट पडलेले उद्वाहकाचे काम पूर्ण करून सुविधा उपलब्ध करावी.

- फलाट क्रमांक २ आणि ४ वर सरकते जिने उपलब्ध करावे.

- स्थानकाबाहेरील फेरीवाले, हॉटेल, रिक्षाचालकांनी वेढलेला परिसर गर्दीमुक्त करावा.

- अपघात, आत्महत्या रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांचे पेट्रोलिअम वाढवणे.

"विक्रोळी स्थानकात अपघाताच्या घटना वारंवार घडत आहे हे सत्य आहे. गतवर्षी ५८ अपघात झाले आहेत. विविध कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. हे रोखण्यासाठी शून्य अपघात यासाठी आम्ही रेल्वे पोलीस आणि प्रशासन मिळून कार्यरत आहोत. स्थानकात उद्वाहक, दिव्यांग शौचालय ही कामे सुरू आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होतील."

- डी.एस.अरोरा, स्टेशन प्रबंधक, विक्रोळी स्थानक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in