मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)-२०२६ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील नाव किंवा नोंदींबाबत नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी
मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)-२०२६ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील नाव किंवा नोंदींबाबत नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. नागरिकांनी वेळेत नमुना (फॉर्म) क्रमांक ६, ७ आणि ८ योग्यप्रकारे भरून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून २९ ऑक्टोबरपर्यंत त्यांचा निपटारा केला जाणार असून, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

बृहन्मुंबईतील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयात बैठक झाली. यावेळी चोक्कलिंगम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांकडून प्राप्त होणारे दावे, हरकती तसेच विविध अर्जांची विहित वेळेत आणि योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदणी शिबिरे

मतदारांना विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील पदनिर्देशित ठिकाणी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

दावे-हरकतींची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणार

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रारूप मतदार यादीतील नावे, नोंदी तसेच नागरिकांकडून करण्यात येणारे दावे-हरकती याबाबतची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

तीन प्रकारचे अर्ज

मतदार यादीत पात्र व्यक्तीचे नाव नव्याने समाविष्ट करण्यासाठी किंवा यादीतून सुटलेल्या पात्र नागरिकाच्या नोंदणीसाठी नमुना ६ मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीतील चुकीच्या अथवा दुबार नावावर हरकत घेण्यासाठी तसेच नाव वगळण्यासाठी नमुना ७ वापरता येणार आहे. तर नाव, वय, पत्ता, छायाचित्र आदी तपशीलांमध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ मध्ये अर्ज करता येईल.

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी
नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

ऑनलाइन, ऑफलाइन सुविधा उपलब्ध

दावे व हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज साद करता येणार आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या Voter Services Portal, ECINET किंवा Voter Helpline या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in