Mumbai : 'मसाज सेशन रद्द केल्यामुळे हल्ला केला'; वडाळ्यातील महिलेचा आरोप; Urban Company च्या थेरपिस्टविरोधात तक्रार, Video

वडाळा पूर्व येथील ४६ वर्षीय महिलेने अर्बन कंपनी (Urban Company) अ‍ॅपवरून बुक केलेले मसाज सेशन रद्द केल्यामुळे संबंधित मसाज थेरपिस्टने आपल्यावर हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
Mumbai : 'मसाज सेशन रद्द केल्यामुळे हल्ला केला'; वडाळ्यातील महिलेचा आरोप; Urban Company च्या थेरपिस्टविरोधात तक्रार, Video
Published on

मुंबई : वडाळा पूर्व येथील ४६ वर्षीय महिलेने अर्बन कंपनी (Urban Company) अ‍ॅपवरून बुक केलेले मसाज सेशन रद्द केल्यामुळे संबंधित मसाज थेरपिस्टने आपल्यावर हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नेमकं काय घडलं?

मिड-डेच्या वृत्तानुसार, तक्रारदार शेनाझ एस. या जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असून, त्या आपल्या १८ वर्षीय मुलासह वडाळा पूर्व येथे राहतात. बुधवारी दुपारी ‘फ्रोजन शोल्डर’च्या तीव्र वेदनांमुळे त्यांनी अर्बन कंपनी अ‍ॅपवरून मसाज सेशन बुक केले होते. नियमित येणारी थेरपिस्ट उपलब्ध नसल्याने अ‍ॅपने दुसरी थेरपिस्ट नेमली आणि सायंकाळी ४.३० वाजताचं सेशन निश्चित करण्यात आलं.

शेनाझ सांगतात की, "थेरपिस्ट वेळेआधीच ३.३० वाजताच इमारतीत पोहोचली होती. आमच्या सोसायटीत 'मायगेट' अ‍ॅपवरून प्रवेशाची सूचना येते, पण मला कोणतेही नोटिफिकेशन आले नाही. तरीही ती थेट दारापर्यंत आली,” असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करत थेरपिस्टला घरात प्रवेश दिला. मसाज बेड पाहिल्यानंतर शेनाझ यांना तो नेहमीच्या गरम मसाज बेडपेक्षा मोठा आणि अयोग्य वाटला. “मी तिला नेहमीचा बेड का आणला नाही, असं विचारलं. तिने हाच बेड आहे असं सांगितलं. मी तो बेड बेडरूममध्ये लावण्यास सांगितले, पण तिने तो सेटअप हॉलमध्येच लावण्याचा आग्रह धरला. हॉलमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या असल्याने गोपनियतेच्या कारणास्तव मी तिला त्यासाठी नकार दिला. पण तिने आग्रह सुरूच ठेवल्यामुळे अखेर मी सेशन रद्द करायचे आहे असे सांगितले आणि दुसऱ्या उपलब्ध वेळेसाठी ॲप तपासू लागले"

सेशन रद्द करताच मारहाण

"त्यानंतर थेरपिस्ट काही वेळ शांत उभी होती. पण अचानक तिने, स्वतः अर्बन कंपनी नोएडामध्ये सुरू केलीये, अशा फुशारक्या मारायला सुरूवात केली आणि मोबाईल हातात घेऊन ती घरात फिरायला लागली. ती किचन आणि हॉलमध्ये फिरत शिवीगाळ करू लागली. मी तिला घराबाहेर जाण्यास सांगितलं. तेव्हा ती हिंसक झाली. तिने माझे केस ओढले, तोंडावर ठोसा मारला आणि चेहऱ्यावर ओरबाडले. माझा मुलगा मध्ये पडला तेव्हा त्याच्यावरही हल्ला केला,” असा आरोप शेनाझ यांनी केला आहे. यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल केला. “पोलिसांनी मला थेट पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. तोपर्यंत ती महिला निघून गेली होती,” असं त्या म्हणाल्या.

अनधिकृत प्रवेशाचा संशय

शेनाझ यांनी सोसायटीतील सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली असता मायगेट अ‍ॅपमध्ये थेरपिस्टच्या प्रवेशाची कोणतीही नोंद नसल्याचं समोर आलं. सुरक्षारक्षक क्षणभर व्यस्त असताना तिने नोंद न करता आत प्रवेश केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिस आणि अर्बन कंपनीची भूमिका

“हा नॉन-कॉग्निझेबल गुन्हा असल्याने पुढील तपास होणार नाही. पीडितेला न्यायालयीन किंवा दिवाणी मार्ग अवलंबावा लागेल,” असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, अर्बन कंपनीकडून प्रतिक्रिया देताना कंपनीच्या प्रवक्त्या भाव्या शर्मा यांनी सांगितले की, “आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत काम करत आहोत आणि त्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. संबंधित थेरपिस्टला सध्या काढून टाकण्यात आले आहे."

logo
marathi.freepressjournal.in