
मुंबई : लग्नाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईतील जोडप्याला यशस्वी गर्भधारणा झाली आणि गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यात गर्भवतीने बाळाला जन्म दिला. मात्र बाळाला जन्मजात क्षयरोगाचे निदान झाले. जन्मल्यानंतर पुढची पाच महिने बाळ मृत्यूशी झुंज देत होते. जगण्यासाठी या बाळाने केलेला संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे. परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये या बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले.
मुंबईतील घाटकोपर येथे राहणारे निशांत आणि निलिमा गुप्ते (नाव बदलले आहे) या जोडप्याने एप्रिलमध्ये मुलाला जन्म दिला. लग्नाच्या १३ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि वंध्यत्वाशी यशस्वी झुंज दिल्यानंतर त्यांना अपत्यप्राप्ती झाली. मात्र अकाली जन्मलेल्या व १.२ किलो वजनाच्या नवजात बाळाला गंभीर गुंतागुंतीते निदान झाले. जन्मानंतर पहिल्याच दिवशी बाळाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्याला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांनी मुंबईतील वाडिया बाल रुग्णालयात धाव घेतली.
बाळाला जन्मजात टीबी होता. त्यामुळे ब्रॉन्कोस्कोपी करण्यात आली. त्यात जन्मजात टीबीचे निदान झाले. ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती असून त्यावर उपचार करणे अनेकदा आव्हानात्मक ठरते, असे वाडिया रुग्णालयातील बालरोग फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. परमार्थ चांदने यांनी सांगितले.