नगरविकास विभागाकडून प्रभाग रचनेचे आदेश; मुंबईसाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

साडेतीन वर्षांनंतर मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील २९ महानगरपालिका, नगर परिषदेच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी जारी केले आहेत. या प्रभाग रचनेसाठी गुगल मॅपचा आधार घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगरविकास विभागाकडून प्रभाग रचनेचे आदेश; मुंबईसाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : साडेतीन वर्षांनंतर मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील २९ महानगरपालिका, नगर परिषदेच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी जारी केले आहेत. या प्रभाग रचनेसाठी गुगल मॅपचा आधार घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरविकास विभागाने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्याने पुढील तीन ते चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, मुंबईत २२७ प्रभागात प्रभाग रचना करण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत, तर ठाणे, नाशिकसह अ, ब, क वर्ग महापालिकांत चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांनुसार, तर ‘ड’ वर्गातील १९ महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

७ मार्च २०२२ रोजी मुंबईतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ८ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे, मात्र ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामाची तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने नगरविकास विभागाला प्रभाग रचनेचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी नगरविकास विभागाने २९ महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद याठिकाणी प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले.

प्रभाग रचनेच्या कामासाठी अडीच महिने लागणार

प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर हरकती, सूचना मागवण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिका आयुक्त तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी हरकती, सूचनांवर सुनावणी घेतील. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना यादी निवडणूक आयोगाला सादर करतील, असे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चार सदस्यीय प्रभाग रचना

महायुती सरकारच्या काळात ८ सप्टेंबर २०२२ च्या अधिनियमानुसार अ, ब व क महापालिकांना चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. या महानगरपालिकांच्या प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तिथे चार पालिका सदस्य, परंतु तीनपेक्षा कमी नाहीत व पाचपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील, अशी तरतूद करण्यात आली आहे. या महापालिकांत पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली या महापालिकांत चार सदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यात आल्या आहेत.

राज्यातील १९ ‘ड’ वर्ग महापालिकेसाठी प्रभाग रचनेचे आदेश जारी करण्यात आले असून या प्रभाग रचनेची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर असणार आहे. या महापालिकांमध्ये उल्हासनगर, पनवेल महापालिकेचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in