Mumbai : कचरा हटविण्याचे आव्हान; केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून झाडाझडती, कचऱ्यापासून ऊर्जानिमिर्ती प्रकल्प राबवा

मुंबईतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ दैनंदिन कचरा उचलण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही.
Mumbai : कचरा हटविण्याचे आव्हान; केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून झाडाझडती, कचऱ्यापासून ऊर्जानिमिर्ती प्रकल्प राबवा
Mumbai : कचरा हटविण्याचे आव्हान; केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून झाडाझडती, कचऱ्यापासून ऊर्जानिमिर्ती प्रकल्प राबवा
Published on: 

मुंबई : मुंबईतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ दैनंदिन कचरा उचलण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. वर्षानुवर्षे साठलेल्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्मूलन, क्षेपणभूमीची पर्यावरणीय पुनर्स्थापना आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती अशा उपाययोजनांद्वारे या व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्याचे मोठे आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर देवनार क्षेपणभूमीला भेट देत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य राज्यमंत्री तोखन साहू यांनी महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. जुन्या कचऱ्याचे जैवखनन वेगाने पूर्ण करण्यासह कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्याची सूचना त्यांनी केली.

या पाहणी दौऱ्यात साहू यांनी स्वच्छ भारत अभियान-शहरी अंतर्गत मुंबई महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. यावेळी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर, केंद्रीय राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव एम. बी. सिंह आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत रोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया यांची सद्यस्थिती, ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण, तसेच देवनार क्षेपणभूमीवरील जुन्या कचऱ्याचे जैवखनन व पर्यावरणीय पुनर्स्थापना याबाबत मंत्र्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती आणि संपीडित जैववायू निर्मितीसारख्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला.

मुंबईसारख्या शहरात स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शाश्वत नागरी व्यवस्था निर्माण करण्यासाठी अशा प्रकल्पांची अंमलबजावणी निश्चित कालमर्यादेत होणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी पालिका करीत असलेल्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले.

चक्रीय अर्थव्यवस्थेची तत्त्वे राबवा

जुन्या कचऱ्याचे जैवखनन व पर्यावरणीय पुनर्स्थापनेचे काम वेगाने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याची क्षमता वाढवावी आणि संसाधनांचा पुनर्वापर व पुनर्प्राप्ती यांना प्राधान्य द्यावे, असे साहू यांनी स्पष्ट केले. कचऱ्याचे व्यवस्थापन करताना चक्रीय अर्थव्यवस्थेची तत्त्वे प्रभावीपणे राबविण्याची गरजही त्यांनी केली.

उपाययोजनांचे सादरीकरण!

क्षेपणभूमीवरील संभाव्य आग दुर्घटना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीही यावेळी देण्यात आली. कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, त्यातून पुन्हा वापरता येणाऱ्या संसाधनांची पुनर्प्राप्ती आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी महापालिका कोणत्या उपाययोजना करीत आहे, याचे सादरीकरण अधिकाऱ्यांनी केले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)