मुंबईकरांना पाणी दिलासा; पाणीपट्टीत वाढ न करण्याचे BMC चे आश्वासन

पाणीपट्टीत वाढ करण्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही, असे स्पष्टीकरण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.
मुंबईकरांना पाणी दिलासा; पाणीपट्टीत वाढ न करण्याचे BMC चे आश्वासन
मुंबईकरांना पाणी दिलासा; पाणीपट्टीत वाढ न करण्याचे BMC चे आश्वासन(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : शहरातील पाणीपट्टीत ८ टक्क्यांपर्यंत वाढ करणार या आशयाची बातमी दै. ‘नवशक्ति’ने १७ मार्च रोजी प्रसिद्ध केली होती. पाणीपट्टीत वाढ होणार का? किती वाढ होणार आदी प्रश्नांची प्रशासनाने नीट उत्तर द्यावी, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली. दरम्यान, पाणीपट्टीत वाढ करण्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही, असे स्पष्टीकरण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

सभागृहात पाणीपट्टीत वाढ होणार का हा मुद्दा उपस्थित करत दै. ‘नवशक्ति’च्या बातमीचा उल्लेख किशोरी पेडणेकर यांनी केला.

रितू तावडे यांनी महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाणीपट्टी वाढीला स्थगिती दिल्याचे जाहीर केले होते. मात्र पाणीपट्टीत ८ टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे.

पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईला पिण्याच्या पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबवला तर ते पाणी मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे होईल. ८ टक्क्यांपर्यंत वाढ केली, तर मुंबईकरांना फटका बसेल. राज्य सरकारकडे १० हजार कोटींची थकबाकी आहे. ती थकबाकी वसूल करता येईल यावर पालिका प्रशासनाने भर द्यावा, ८ टक्क्यांनी वाढ केली तर बिलात किती वाढ होईल, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. पाणीपट्टीत वाढ केल्यास मुंबईकरांवर अन्याय होईल. त्यामुळे ती करू नये, असेही ते म्हणाले.

झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. तर ८० टक्के टॉवरमध्ये टँकरने पाणीपुरवठा होतो. शुद्ध व स्वच्छ पाणी मुंबईकरांचा अधिकार आहे. मुदत ठेवी मोडीत काढत प्रकल्प राबवताय मग पाणीपट्टीत वाढ का, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी केला.

किशोरी पेडणेकर आपण ज्येष्ठ सदस्य आहात. परीक्षेला जाताना अभ्यास केला पाहिजे. जनता हवालदिल नाही तर कोण हवालदिल झाले हे सगळ्यांना माहीत आहे.

विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांचे निवेदन राजकीय हेतूने प्रेरित आहे, अशी टीका सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली.

किशोरी पेडणेकर यांचे निवेदन दिशाभूल करणारे

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचे सभागृहात केलेले निवेदन दिशाभूल करणारे आहे. कारण २०२१-२२ मध्ये पाणीपट्टीत ५.२९ टक्क्यांनी वाढ केली होती. मात्र २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांत मुंबई महापालिकेने पाणीपट्टीत वाढ केलेली नाही. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ८ टक्के पाणीपट्टीत वाढ ही होणार नाही, तसा उल्लेख महायुतीच्या वचननाम्यात आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

२५ वर्षांतील गळती थांबवावी - महापौर

मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा ज्वलंत प्रश्न आहे. तरीही आम्ही पाणीपट्टीमध्ये वाढ केलेली नाही. २५ वर्षांतील गळती थांबवावी, असा टोला महापौर रितू तावडे यांनी विरोधकांना लगावला.

logo
marathi.freepressjournal.in