

मुंबई : मुंबईची तहान भागवण्यासाठी खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीने हाती घेतला होता. मात्र राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आणि एकनाथ शिंदे सरकारने हा प्रकल्प रद्द केला. शिंदे यांच्यामुळे मुंबईवर पाणी संकट गडद झाले, अशी टीका युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांवर बोट ठेवत मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करणाऱ्या विहीर, बोअरवेल मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच मुंबईतील विहिरी किंवा बोअरवेल मालकांनी पालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक केले. तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी विहिरी भोवतीची दोन हजार चौरस फुटांची जागा मोकळी सोडणे, पाणी भरताना टँकर्स सोसायटी किंवा चाळीजवळ उभे करू नयेत, पाण्याचे पूर्ण वर्षाचे पैसे आगाऊ भरणे, टँकर्समधील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी मीटर बसविणे, रेन वॉर्टर हार्वेस्टिंग करणे आदी जाचक अटी या नोटीसद्वारे घातल्या आहेत. यामुळे पाणीपुरवठा व्यवसाय धोक्यात येणार आहे. विहिरी आणि बोअरवेल मालकांनी तसेच टँकर्स मालकांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेधार्थ गुरुवारपासून पाणीपुरवठा सेवा बंद केली आहे. शिवसेनेने (ठाकरे) या आंदोलनाला पाठिंबा देत, मुंबईतील पाणीटंचाईच्या प्रश्नांवरून पालिकेला जाब विचारला आहे. आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून पक्षाची भूमिका मांडली आहे.
पालिका उपाययोजना करणार का?
उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत वाढ होते. त्यात उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत घट होते. यातच मुंबई महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर मालकांना नोटीस बजावल्याने त्यांनी गुरुवारपासून पाणीपुरवठा बंद केला आहे. यामुळे अनेक प्रकल्पांवर परिणाम होणार असून उद्योगधंद्यांना मोठा फटाका बसणार आहे. दरम्यान, मुंबईतील पाणीपुरवठ्याबाबत काही उपाययोजना करणार आहे का, याचे उत्तर पालिका प्रशासनाने द्यावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत केली आहे.