

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगदा क्रमांक १ व जलबोगदा क्रमांक २ यांचे भरण अर्थात चार्जिंग, तसेच धुलाई अर्थात फ्लशिंग, क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून यासाठी एल (कुर्ला-पूर्व), एम -पूर्व, एम-पश्चिम, एन, एस, टी आणि ए, बी, सी, ई, एफ-उत्तर, एफ-दक्षिण या विभागांत २० ते २७ एप्रिल या कालावधीत पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठ्याकामी अमर महल ते वडाळा आणि पुढे परळ जलबोगदा १ (एएमटी-१) कार्यान्वित आहे. तसेच, अमर महल (हेगडेवार उद्यान) ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय आणि पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय जलबोगदा २ हाही अविरत कार्यरत आहे. जलबोगद्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे भरण (चार्जिंग), धुलाई (फ्लशिंग), क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही सर्व कामे २० ते २७ एप्रिल या कालावधीत केली जाणार आहेत.
या कामामुळे मुंबई पूर्व उपनगरातील एल (कुर्ला पूर्व), एम-पूर्व, एम-पश्चिम, एन, एस, टी आणि मुंबई शहरातील ए, बी, सी, ई, एफ-उत्तर आणि एफ-दक्षिण या विभागात पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात लागू राहणार आहे.