

मुंबई : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. या अंतर्गत १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची जोडणी व इतर कामे केली जाणार आहेत.
या कामांसाठी तुर्भे उच्चस्तरीय जलाशयाची १८०० मिमी आणि निम्नस्तरीय जलाशयाची १२०० मिमी जलवाहिनी तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवार, ५ मे रोजी सकाळी १० ते बुधवार, ६ मे रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत (एकूण ३० तास) केली जाणार आहेत. या कामादरम्यान शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण आणि पूर्व उपनगरातील एल, एम पूर्व, एम पश्चिम व एन विभागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
अमर महल (हेडगेवार उद्यान) ते वडाळा (प्रतीक्षा नगर) आणि पुढे परळ (एएमटी-१) पर्यंत, तसेच अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय (एएमटी २) आणि पुढे तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम महानगरपालिकेमार्फत केले जाणार आहे. या अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत तुर्भे उच्चस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा करणारी १८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी १८०० मिलिमीटर व्यासाच्या दुसऱ्या जलवाहिनीस जोडली जाणार आहे.
तसेच, या अनुषंगाने इतर जलकामेदेखील करण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा विषयक कामे करण्यासाठी तुर्भे उच्चस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा करणारी १८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आणि तुर्भे निम्नस्तरीय जलाशयाची १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे.