Mumbai : धरणांत फक्त ५.३२ टक्के पाणीसाठा! सर्वाधिक पाणी पुरवणाऱ्या भातसाने तळ गाठला; BMC ने पाणीकपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने राज्य सरकारने दोन लाख २८ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला असून तो वापरण्यास सुरुवात केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईत पावसाची बऱ्यापैकी एंट्री झाली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मात्र पावसाची दमदार इनिंग सुरू झालेली नाही. मात्र जून अखेरनंतर धरणक्षेत्रात पाऊस बरसेल, अशी अपेक्षा कायम आहे. त्यात जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे तूर्तास तरी आणखी पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणापैकी भातसा धरणाची क्षमता ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटरची असून सर्वाधिक पाणीपुरवठा भातसातून होतो. मात्र यंदा भातसा धरणाने तळ गाठला असून पाण्याची पातळी शून्यवर आली आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४३ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्याने ५ जूनपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. रोज पाणीपुरवठा होतो, त्यापैकी १० टक्के पाण्याची बचत होत असल्याने रोज ४०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे. त्यात मुंबईकरांनी पिण्याच्या पाण्याचा वापर योग्यप्रकारे करावा, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने राज्य सरकारने दोन लाख २८ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला असून तो वापरण्यास सुरुवात केली आहे. तरीही जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका पाणीसाठा असल्याने तूर्तास तरी आणखी पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाणीसाठ्यात वाढ होण्याचा विश्वास

उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते. मुंबई व परिसरात मान्सून दाखल झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच उन्हाचा पारा कमी झाल्याने धरणक्षेत्रातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत असून पुढील काही दिवसांत धरणक्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग होईल आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

२० जून रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

भातसा - ०

अप्पर वैतरणा - ०

मोडक सागर - १९,६५७

तानसा - ३१,०४९

मध्य वैतरणा - १९,३८६

विहार - ५,०३५

तुळशी - १,९२५

तीन वर्षांची २० जूनची स्थिती

- २०२४ ७७, ०५२ दशलक्ष लिटर ५.३२ टक्के

- २०२३ १,११,६७४ दशलक्ष लिटर ७.७२ टक्के

- २०२२ १,५१,२३८ दशलक्ष लिटर १०.४५ टक्के

logo
marathi.freepressjournal.in