मुंबईत पाणीकपात; धरणांत फक्त २८.३५ टक्के पाणीसाठा

सध्याचा उन्हाचा कहर आणि यंदा पाऊस कमी होण्याचा वर्तवला गेलेला अंदाज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आतापासूनच उपाय योजायला सुरुवात केली आहे.
मुंबईत पाणीकपात; धरणांत फक्त २८.३५ टक्के पाणीसाठा
मुंबईत पाणीकपात; धरणांत फक्त २८.३५ टक्के पाणीसाठा प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : सध्याचा उन्हाचा कहर आणि यंदा पाऊस कमी होण्याचा वर्तवला गेलेला अंदाज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आतापासूनच उपाय योजायला सुरुवात केली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आजघडीला पुरेसे पाणी आहे. तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून येत्या १५ मेपासून दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये २८ एप्रिल रोजी २८.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा ६ जुलैपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे. तर भातसा व अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा उपलब्ध झाला तर तो १७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. परंतु एल नीनो मुळे यंदा कधी व किती पाऊस पडेल याचा अंदाज नाही. त्यामुळे १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात ४ लाख १० हजार ३५७ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा १७ ऑगस्टपर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकतो, इतका उपलब्ध आहे.

मात्र, एल नीनोचा प्रभाव असल्याने यंदा पाऊस किती व कधी पडेल याचा अंदाज नाही. त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन म्हणून १५ मे पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले. 

दरम्यान, या कपातीची झळ ठाणे भिवंडीतील महापालिका हद्दीतील रहिवाशांनाही बसणार आहे. ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्रात दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या भागातील लोक घरगुती व व्यवसायिक कामासाठी पाण्याचा वापर करतात.त्या परिसरातील गावांतही १० टक्के पाणी कपातीची झळ बसणार आहे.

मुंबईत पाणीकपात; धरणांत फक्त २८.३५ टक्के पाणीसाठा
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा...१ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव

आटत चाललेले पाणी

२८ एप्रिल रोजी पाणीसाठा (दशलक्ष लिटर) 

  • अप्पर वैतरणा - ५३,४८९ 

  • मोडक सागर - ४४,८२५

  • तानसा - ३३,८४६

  • मध्य वैतरणा - ६३,३४८

  • भातसा - १,९७,३२१

  • विहार - १४,५६३ 

  • तुळशी - २,९६६

राखीव पाणीसाठा मुंबईला तारणार!

अप्पर वैतरणा धरणातून ९३ हजार ५०० मिलियन लिटर तर भातसा धरणातून १ लाख ३७ हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठ्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राखीव पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल. 

logo
marathi.freepressjournal.in