

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवडी परिसरातील भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी बुधवार, २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून ते गुरुवार, २३ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत १८ तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
या कालावधीत ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘ई’ आणि ‘एफ दक्षिण’ विभागातील अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
भंडारवाडा, फॉसबेरी आणि गोलंजी टेकडी जलाशयांचा पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी ही कामे केली जात आहेत. महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पाणीपुरवठा बंद असताना काटकसरीने पाण्याचा वापर करावा तसेच पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असा सल्ला महापालिकेकडून देण्यात आला आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद राहणार
‘ए’ विभाग : पी. डिमेलो मार्ग परिसर, सीएसएमटी, सेंट जॉर्ज रुग्णालय, आरबीआय परिसर आदी ठिकाणी २२ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद.
‘बी’ विभाग : उमरखाडी, चिंचबंदर, मशिद बंदर, नूरबाग, वालपाखाडी, कारागृह मार्ग यांसह विविध भागांत २२ व २३ एप्रिल रोजी वेगवेगळ्या वेळांना पाणीपुरवठा बंद.
‘सी’ विभाग : बोरा बाजार, मशीद परिसर, पाकमोडिया स्ट्रीट आदी भागांत २३ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद.
‘ई’ विभाग : नागपाडा, मदनपुरा, काळाचौकी, चिंचपोकळी, माझगाव, जे. जे. रुग्णालय परिसरात २२ एप्रिलला पाणी बंद किंवा २३ एप्रिलला कमी दाबाने पुरवठा.
‘एफ दक्षिण’ विभाग : शिवडी, वडाळा (पूर्व), दादर, लालबाग, परळ आदी भागांत काही ठिकाणी पूर्ण बंद, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा.
याशिवाय केईएम, टाटा, वाडिया यांसारख्या प्रमुख रुग्णालयांना या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.