मुंबईसह आजूबाजूच्या शहरात ३५ ते ४० अंशांपर्यंत तापमान पोहचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे. म्हणूनच घराच्या अंगणात, गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वच ठिकाणी तीव्र उष्णतेच्या झळा लागत आहेत. अशातच अवकाळी पावसाने काही जिल्ह्यात हजेरी लावल्याने तापमानात चढउतार दिसून येत आहे. उन्हाळ्यात ठराविक वेळेनंतर थंड पाणी पिऊन आपण स्वत:ला उन्हापासून वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. असेच काहीसे प्राणी-पक्ष्यांचेही आहे. त्यांनाही पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याअभावी अनेक प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू होतो. निसर्गाच्या साखळीमध्ये प्राणी-पक्ष्यांना देखील सर्वाधिक महत्त्व आहे. यासाठी एक जबाबदार नागरिक, सामाजिक भान, माणुसकी म्हणून आपण प्राणी-पक्ष्यांसाठी, त्यांची तहान भागवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात तळमळीने प्रयत्न केले पाहिजे. अनेक पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आज पुढे येऊन काम करत असून आपण देखील घराच्या खिडकीत, अंगणात, इमारतीच्या गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे गरजेचे आहे.
उष्णतेमुळे होणारा परिणाम हा फक्त माणसांवरच न होता पक्षी आणि प्राणी यांच्यावरही होत असल्याचे दिसते आहे. परळ येथील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अँनिमल्सने दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये पक्षी आणि प्राण्यांमध्ये निर्जलीकरण होण्याच्या घटनांमध्ये ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३० विविध प्राणी आणि पक्ष्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल केलेल्या प्राण्यांमध्ये दोन कासवे, कबूतरे, गरूड, घुबडे आणि कावळे यांचा सामावेश आहे.
दरम्यान, उन्हाळ्याचा पक्ष्यांना होत असलेला सर्वाधिक त्रास पाहून येत्या काही दिवसांत रूग्णालयात दाखल होणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षांत उष्णतेला बळी पडणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मार्च २०२२ मध्ये १०० पक्षी जखमी झाले होते. यावर्षी याच कालावधीत हा आकडा १५० वर पोहोचला आहे. गेल्या सात दिवसांत हे प्रमाण जवळजवळ दुप्पट झाले आहे. सर्व पक्ष्यांमध्ये उष्माघात, तीव्र निर्जलीकरण आणि उच्च शरीराचे तापमान असलेला ताप ही लक्षणे दिसून येत आहेत.
पाचोळा न जाळण्याचे आवाहन
उन्हाळ्याच्या दिवसात झाडांची पानगळ होत असते. हा पालापाचोळा झाडाखाली साचून असतो. पालापाचोळ्याखाली किडे, गांडूळ तयार होतात. ते खाण्यासाठी पक्ष्यांना मेजवानी असते. बऱ्याच वेळा हा कचरा झाडून जाळला जातो. पण हा कचरा जाळू नका व शक्यतो एका ठिकाणी जमा करून ठेवा, असे आवाहन पक्षीमित्रांनी केले आहे. एकतर धुरामुळे प्रदूषण होते शिवाय पक्ष्यांनाही ते त्रासदायक होते. या कचऱ्याखाली मिळणाऱ्या नैसर्गिक खाद्यापासून पक्षी वंचित राहतात.
अशी करता येईल व्यवस्था!
- घरी सावलीच्या ठिकाणी व पक्ष्यांना मुक्त वातावरण मिळेल अशा ठिकाणी मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवावे. पक्ष्यांना आंघोळही करता येईल, असे भांडे असावे.
- पाण्यासोबतच अन्नाची व्यवस्थाही करता येईल. विशेषत: ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आदी धान्याचा भरडा उत्तम ठरेल. यासह भाताचे शित व पोळ्यांचे बारीक तुकडे करून ठेवता येतील.
- पाणी आणि धान्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या, बरण्या, तार, दोरी, मातीचे भांडे आदींचा वापर करून फीडर तयार करता येईल. असे कृत्रिम फीडर आता बाजारातही उपलब्ध आहेत.
- मातीचे पात्र बांधणे शक्य नसेल तर नारळाच्या करवंटीचा वापर केला जाऊ शकतो. झाडावर बांधणे शक्य नसेल तर झाडाखाली, झुडपात सावली राहील तिथे पाणी व धान्य ठेवावे.
- उद्यानात जाता-येताना आवर्जून सोबत पाणी घेऊन जा आणि झाडांना टांगलेल्या पात्रात ओता. घरून बाहेर निघताना सोबत पाणी ठेवा जेणेकरून शक्य होईल, त्या पात्रात पाणी भरता येईल.
आरेच्या जंगलात लावल्या पाण्याच्या बाटल्या
शंकर सुतार नामक युवक गोरेगाव येथील आरे जंगलात कडाक्याच्या उन्हात आपली पर्यावरणप्रती असलेली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. आता पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. हे टाळण्यासाठी या युवकाने पुढाकार घेतला असून आरेच्या जंगलात त्याने मागील काही महिन्यात तब्ब्ल ५० पाण्याच्या बाटल्या पक्ष्यांसाठी लावल्या आहेत. तर अनके मातीची भांडी पाणी भरत प्राण्यांसाठी ठेवली आहेत. सुरुवातीला एकटा वाटचाल करणाऱ्या शंकरसोबत आज अनेक युवक सहभागी होत हातभार लावत आहेत.
"मी एक प्रवासी आहे. मी माझा प्रवास फक्त सामाजिक भान ठेवून करत आहे. ज्या निसर्गाने आपल्याला बनवलं त्यालाच आज जपण्याची वेळ आली आहे. मी या उपक्रमाद्वारे मुक्या जीवांची तहान मिटवण्याचा तसेच पर्यावरण रक्षणासाठी लहानसा वाटा उचलत आहे. तुम्हीही ही संकल्पना अंमलात आणावी हीच अपेक्षा."
- शंकर सुतार, पर्यावरण रक्षक, निसर्ग माझा संस्था
"उन्हाळा वाढल्याने पक्ष्यांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. लोकांनी घराच्या गॅलरीत, गच्चीत किंवा इमारतीच्या भिंतीवर मीठ, साखर घातलेले पाणी एका भांड्यामध्ये ठेवले पाहिजे. हे पाणी त्यांना ताकद देण्यासाठी उपयोगी ठरेल."
- शिवाजी तळेकर, पशुवैद्य