
मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा ९५.१३ टक्के इतका झाला आहे. मागील वर्षी याच वेळी हा पाणीसाठा ९४. ४९ टक्के इतका होता. दरम्यान, धरणांतील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने मुंबईकरांची वर्षभराची पाणीचिंता मिटली आहे.
यंदा मे महिन्यापासूनच पावसाला दमदार सुरुवात झाल्याने तलावसाठ्यात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात प्रमुख तलावांमधून पाणीपुरवठा होतो. या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता १ लाख ४४ हजार ७३६.३ कोटी लिटर (१४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे. तर आतापर्यंत मुंबईच्या धरणक्षेत्रात १३ लाख ७६ हजार ८७५ दशलक्ष पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर, तुळशी, विहार, तानसा हे तलाव १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागले आहेत. तर भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा हे तलाव १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.
सात धरणांमधील पाणीसाठा
अप्पर वैतरणा - ९१.५१ टक्के
मोडकसागर - १०० टक्के
तानसा - १०० टक्के
मध्य वैतरणा - ९८.६९ टक्के
भातसा - ९३.१९ टक्के
विहार - १०० टक्के
तुळशी - १०० टक्के
एकूण पाणी साठा
९५.१३ टक्के