
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे या सातही तलावांतील पाणीसाठ्यात १७,०४० दशलक्ष लीटर म्हणजेच चार दिवसांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हा पाणीसाठा १०.१९ टक्के झाला आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात दररोज ४ हजार दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा वाढला आहे. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर म्हणजे १ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दिवसांच्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. मात्र यंदा उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. तर दुसरीकडे पालिकेला पाणी चोरी आणि गळती पूर्णपणे रोखणे शक्य न झाल्याने सात तलावांतील पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होऊन थेट १० टक्क्यांपर्यंत घसरली होती. पालिकेने राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या तलावांमधून अगोदरच १ लाख ८१ हजार दशलक्ष लीटर इतक्या राखीव पाणीसाठ्याची तजवीज करून ठेवली आहे. पाणीसाठा ९ टक्क्यांवर आल्यानंतर दोन दिवसांपूर्वीपासून राखीव साठा वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र १५ जून रोजी रात्रीपासून ते १६ जून रोजी रात्रीपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्हा परिसरातील तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडला. १५ जून रोजी तुळशी तलावात ६६ मिमी, मध्य वैतरणा तलावात ६० मिमी, विहार तलावात ४३ मिमी, तर भातसा तलावात ३३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
तसेच, १६ जून रोजी तुळशी तलावात सर्वात जास्त १६२ मिमी, विहार तलावात १०१ मिमी, मोडक सागर - ८७ मिमी, मध्य वैतरणा - ८० मिमी, तानसा - ६२ मिमी, भातसा - ६१ मिमी आणि सर्वात कमी म्हणजे अप्पर वैतरणा तलावात - २३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे १६ जून रोजी सकाळी ६.०० वाजता सात तलावांत एकूण पाणीसाठा १,२४,४७१ दशलक्ष इतका म्हणजे दैनंदिन पाणीपुरवठ्याचे प्रमाण पाहता पुढील ३१ दिवस पुरेल इतका होता. तर, १७ जून रोजी सकाळी ७.०० वाजता सात तलावांत एकूण पाणीसाठा १,४१,५११ दशलक्ष लीटर इतका म्हणजे पुढील ३५ दिवस पुरेल इतका जमा झाला. दोन दिवसांतील पावसाचे प्रमाण व त्यामुळे वाढलेला पाणीसाठा याचे गणित केल्यास १६ जून रोजीच्या पाणीसाठ्यात तब्बल १७,०४० दशलक्ष लीटर इतक्या पाणीसाठ्याची म्हणजेच चार दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाने दिली.