मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट; धरणातील पाण्याच्या पातळीत घट, सातही धरणांत २८ टक्के पाणीसाठा 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने पाणीकपातीची धास्ती निर्माण झाली आहे.
मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट; धरणातील पाण्याच्या पातळीत घट, सातही धरणांत २८ टक्के पाणीसाठा 
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने पाणीकपातीची धास्ती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत सातही धरणांत २८.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात धरणे व राज्य सरकारने मंजूर केलेला राखीव साठा जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका आहे. जून महिन्यात वेळेवर पावसाचे आगमन होईल की नाही याची शाश्वती नसल्याने १५ मे रोजी धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेत पाणीकपातीचा पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

मुंबईला मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. परंतु यंदा सातही धरणांत ४ लाख ११ हजार ३५५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे, तर राज्य सरकारकडून २ लाख ३० हजार ५०० दशलक्ष लिटर राखीव साठा उपलब्ध करण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा व राज्य सरकारने उपलब्ध केलेला राखीव पाणीसाठा मिळून जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका आहे. त्यातच जून महिन्यापासून पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र मुंबईत पाणीबाणी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे मुंबईत पाणीबाणी परिस्थिती टाळण्यासाठी आतापासून उपाययोजना करण्यात येत आहेत. तूर्तास तरी पाणी कपातीचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र १५ मे नंतर सातही धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ठाणे-भिवंडीकरांवरही पाणीकपातीची तलवार 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यातून मुंबईची रोजची तहान भागवली जाते. ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्रात दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र १५ मे नंतर मुंबईत पाणीकपात लागू झाली, तर ठाणे, भिवंडीकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. 

logo
marathi.freepressjournal.in