

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात घट होत आहे. सध्या सातही धरणांमध्ये मिळून २३.५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळा, हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांना पेल्यातून पाणी द्यावे, स्नानासाठी शॉवरचा वापर न करता बादलीतून पाणी घ्या, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे. दरम्यान, शुक्रवार १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने मुंबईकरांना हे आवाहन केले आहे.
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी सात धरणांतून रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ११ मे रोजी ४ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. सध्या धरणात असलेला पाणीसाठा आणि भातसा व अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर १७ ऑगस्टपर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकतो, इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र भविष्यात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे.
राखीव पाणीसाठा तारणार
भातसा धरणातील राखीव पाणीसाठ्यातून १,४७,०९२ दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातील निभावणी साठ्यातून ९०,००० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.
ठाणे, भिवंडीतही पाणी कपात
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्याठिकाणीही शुक्रवार पासून १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.
पुढील गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन
घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका, त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत. वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो.
नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱ्या किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱ्या तोटी (नोझल) बाजारात सहज उपलब्ध असतात. नळांना अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची तब्बल दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी त्याचा वापर करावा.
सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तत्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घ्यावी.