

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत दमदार पाऊस पडल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ७.८८ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा २४ जुलै रोजी ७७.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण क्षेत्रात सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना पाणी दिलासा मिळाला आहे.
मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात २४ जुलै रोजी ११ लाख २३ हजार ४४३ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु राहिली तर पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस ( मिमी)
अप्पर वैतरणा - २९०.०० मिमी
मोडक सागर - १८४.०० मिमी
तानसा - १०८.०० मिमी
मध्य वैतरणा - १७४.०० मिमी
भातसा - ७७.०० मिमी
विहार - ४२.०० मिमी
तुळशी - ७०.०० मिमी
तीन वर्षांतील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)
२०२६ - ११,२३,४४३
२०२५ - १२,६२,६५२
२०२४ - ८,४१,३९८