मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे.
मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

मुंबई : वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. १८ मे रोजी सातही धरणांत १ लाख ७६ हजार ०२६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६ टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे मुंबईत जून महिन्यात पावसाने हजेरी लावली नाही तर मात्र मुंबईला पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. गेल्या जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईकरांना जुलै अखेरपासून १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने मुंबईवरील पाणीकपात रद्द करण्यात आली होती. यंदाही सातही धरणांत १२.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून राज्य सरकारने २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केल्याने १५ जुलैपर्यंत मुंबईची तहान भागेल, इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र जून महिन्यात वरुणराजाचे आगमन झाले नाही, तर मात्र मुंबईला पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

यंदा ७ टक्के कमी पाणी

१८ मे २०२२ रोजी तलावात ३,१८,२६८ दशलक्ष लिटर म्हणजेच २१.९९ टक्के पाणी उपलब्ध होते. तर २०२३ मध्ये याच दिवशी २,६३,१६६ दशलक्ष लिटर म्हणजेच १८.१८ टक्के पाणी शिल्लक होते. तर यावर्षी १८ मे २०२४ रोजी १,७६,०२६ दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ १२.१६ टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्के पाणीसाठा कमी आहे.

१५ जुलैपर्यंत पाणीसाठा

यावर्षी पाणीसाठा खालावल्यामुळे पालिकेला राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा धरणातून ९३ हजार ५०० मिलियन लिटर व भातसा धरणातून १ लाख ३७ हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठा मिळाला आहे. तर मुंबई महापालिकेकडे १ लाख ७६ हजार ०२६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून १५ जुलैपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका आहे. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पाऊस लांबल्यास जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

असा टाळा पाण्याचा अपव्यय

  • दैनंदिन जीवनात पाण्याची काटकसर करा.

  • पाणी बचतीच्या सवयी अंगिकारा.

  • आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेऊन प्या.

  • आंघोळ शॉवरने न करता बादली घेऊन करा

  • नळ सुरू ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा.

  • घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका.

  • वाहने पाण्याने न धुता ओल्या फडक्याने धुवा.

  • शिळे पाणी फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये वापरा.

१८ मे रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा - ११,७३०

  • मोडक सागर - २४,८९५

  • तानसा - ४४,४०९

  • मध्य वैतरणा - २१,०१२

  • भातसा - ६४,२५८

  • विहार - ७,१२७

  • तुळशी - २,५९५

logo
marathi.freepressjournal.in