पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेचे ढग; मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात किंचित घट

गेल्या तीन ते चार दिवसांत धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईचा पाणीसाठा ५० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला होता.
पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेचे ढग; मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात किंचित घट
पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेचे ढग; मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात किंचित घट(Photo-X/@mybmc)
Published on

मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांत धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईचा पाणीसाठा ५० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. मात्र, गेल्या २४ तासांत पावसाने धरण क्षेत्राकडे पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे पाणीसाठ्यात ०.१८ टक्क्यांची किंचित घट झाली आहे. शुक्रवारी १० जुलै रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील एकूण पाणीसाठा ४९.४१ टक्क्यांवर आला असून त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.

मुंबईची तहान भागवण्यासाठी मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि तानसा या सात धरणांमधून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी या धरणांमध्ये एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्यकता असते. शुक्रवार १० जुलै रोजी या धरणांमध्ये ७ लाख १५ हजार २१० दशलक्ष लिटर (४९.४१ टक्के) पाणी उपलब्ध आहे.

धरणांमधील सद्यस्थिती

(१० जुलै रोजीचा पाणीसाठा)

सध्या विहार आणि तुळशी ही दोन धरणे पूर्णपणे (१०० टक्के) भरली असून मोडक सागर आणि तानसा धरणात चांगला साठा आहे. मात्र, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा धरणातील साठा अजूनही निम्म्यापेक्षा कमी आहे.

१० जुलै रोजी पाणीसाठा ( टक्केवारीत)

  • अप्पर वैतरणा - २७.६२

  • मोडक सागर - ८३.२७

  • तानसा - ७८.३१

  • मध्य वैतरणा - ४३.३९

  • भातसा - ४३.४९

  • विहार - १००

  • तुळशी - १००

धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस ( मिमी)

  • अप्पर वैतरणा - ०.० मिमी

  • मोडक सागर - १.०० मिमी

  • तानसा - ०.०० मिमी

  • मध्य वैतरणा - ०.०० मिमी

  • भातसा - ०.०० मिमी

  • विहार - ०.००मिमी

  • तुळशी - ०.००    मिमी

हलका ते मध्यम पाऊस

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २० जुलैनंतर धरण क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. मात्र, यावर्षी असलेल्या ‘एल निनो’च्या प्रभावामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत केवळ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ऐन जुलै महिन्यातच पावसाने ओढ दिल्यामुळे आणि पुढील महिन्यांचा अंदाज पाहता पालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in