मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवार ८ जूनपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला असून त्यामुळे खासगी टँकरवर अवलंबून असलेल्या विविध सेवांवर सोमवारपासून परिणाम होण्याची शक्यता आहे.
विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी काढण्याआधी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेत नसल्याने सध्या तहसिलदारामार्फत पाणी टँकरमालकांना कारवाईची नोटीस बजावली जात आहे. अशा प्रकारची नोटीस बजावू नये, केंद्रीय भूजल प्राधिकरणांच्या नियमांची अंमलबजावणी मुंबईत करू नये या असोसिएशनच्या प्रमुख मागण्या आहेत.
बैठक निष्फळ
टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी एखादी दोन हजार चौरस फूट जागा असावी, रस्त्यावर टँकर उभे करून पाणी भरू नये इत्यादी नियमांची अंमलबजावणीही भूजल प्राधिकरणाने करण्यास सांगितले. या सर्व मुद्द्याना घेऊन गेल्या दोन वर्षात मुंबई महापालिका, जिल्हाधिकारीमार्फत कारवाई होत होती. यावर तोडगा मात्र निघाला नव्हता. आता तहसिलदारमार्फत ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे पाणी टँकर चालक-मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुलुंडमध्ये तहसिलदारांकडेही बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. तर वांद्रे येथे जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र भेट मिळाली नाही.
मुंबईतील विहिरी आणि कूपनलिकालमधून पाणी काढण्याआधी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम विहीर आणि कूपनलिकाधारक तसेच वॉटर टँकर मालक पाळत नसल्याने कारवाईच्या नोटीस बजावल्या जात आहेत.
संपाची हाक
अखेर ८ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई वॉटर टँकर अससोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अमोल मांढरे यांनी दिली. संप झाल्यास त्याचा परिणाम मुंबई महापालिकेच्या विविध कामांवरही होण्याची शक्यता आहे. महापालिकेकडे पाण्याचे टँकर अत्यल्प आहेत. त्यामुळे संप झाल्यास महापालिकेकडून पर्यायी व्यवस्था मात्र तयार नाही. महापालिकेकडेच अत्यल्प टँकर आहेत. २०२४ आणि २०२५ मध्येही याच कारणांनी वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला होता. आता पुन्हा संपाची हाक दिली आहे.
यांच्यावर होणार परिणाम
मुंबईत सध्या अडीच ते तीन हजार पाण्याचे टँकर आहेत वॉटर टँकरमार्फत दररोज ३५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. रस्ते धुण्यासह अन्य काही कामांसाठीही मुंबई महापालिका खासगी वॉटर टँकरची मदत घेते. विविध प्रकारची बांधकामे, खासगी सोसायटी, हॉटेल्स, खासगी रुग्णालये, रेल्वे, सुलभशौचालये, सलून, खासगी कार्यालये इत्यादींना टँकर चालक पाणीपुरवठा करतात. या सर्वांना संपाचा फटका बसणार आहे.