पाणीचोरी वाढली! मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला; दीड वर्षात सहा हजार अनधिकृत नळजोडण्या 

मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्चून जलवाहिन्या, पंपिंग यंत्रणा मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असतानाच दुसरीकडे मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यावरच डल्ला मारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.
पाणीचोरी वाढली! मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला; दीड वर्षात सहा हजार अनधिकृत नळजोडण्या 
पाणीचोरी वाढली! मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला; दीड वर्षात सहा हजार अनधिकृत नळजोडण्या प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्चून जलवाहिन्या, पंपिंग यंत्रणा मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असतानाच दुसरीकडे मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यावरच डल्ला मारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.

जानेवारी ते डिसेंबर २०२५ आणि जानेवारी ते जून २०२६ या दीड वर्षाच्या कालावधीत मुंबईत ५ हजार ९३६ पाणीचोरीची प्रकरणे पालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहेत. यात सर्वाधिक पूर्व उपनगरात तब्बल २ हजार २५५, शहर भागात २ हजार १८७, तर पश्चिम उपनगरात १ हजार ४९४ प्रकरणांची नोंद झाली आहे.

झोपडीधारक, दुकानदार, हॉटेल, कारखाने, गोदाम मालक अनधिकृतपणे जल जोडणी करून पाणीचोरी करत असल्याचे निदर्शनास आले. पाणीचोरी माफियांच्या विरोधात जल विभागाच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २०२५ आणि जानेवारी ते जून २०२६ पर्यंत बेकायदा जलजोडणी घेणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यात ५,९३६ पाणीचोरीची प्रकरणे उजेडात आली. 

पाणीचोरीच्या प्रकरणांत ‘ई’ वॉर्डने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. भायखळा, डॉकयार्ड रोड, चिंचपोकळी, रे रोड या परिसराचा समावेश असलेल्या या वॉर्डमध्ये तब्बल ९५८ अनधिकृत नळजोडण्यांची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यापाठोपाठ कुर्ला, साकीनाका, चांदिवलीचा समावेश असलेल्या ‘एल’ वॉर्डमध्ये ८८१ प्रकरणे नोंदली गेली आहेत. मालाड मधील ‘पी उत्तर’ वॉर्डमध्येही ६८२, तर चेंबूर, छेडानगर आणि टिळकनगरचा समावेश असलेल्या ‘एम पश्चिम’ वॉर्डमध्ये ५५३ पाणी चोरीची प्रकरणे समोर आली आहेत.

जलवाहिन्यांच्या एअर व्हॉल्व्हवर बेकायदा टॅपिंग करून पाणी वळविणे, जुन्या जलवाहिन्या फोडून थेट पाणी घेणे, बेकायदा पंप बसविणे, मीटरमध्ये फेरफार करणे आणि अनधिकृत नळजोडण्या करणे, अशा विविध मार्गांनी पाणी लुटले जात आहे. काही ठिकाणी या प्रकारांना स्थानिक पाणी माफिया आणि प्रभावशाली व्यक्तींचे संरक्षण मिळत असल्याचा आरोपही केला जातो.

‘सर्वांसाठी पाणी’ योजनेला हरताळ!

मुंबईकरांना कायदेशीर मार्गाने पाणी मिळावे यासाठी महापालिकेने जून २०२२ मध्ये ‘सर्वांसाठी पाणी’ धोरण लागू केले. अनधिकृत झोपडपट्ट्या, प्रकल्पबाधित नागरिक तसेच काही विशिष्ट निकषांनुसार अनधिकृत बांधकामांनाही नळजोडणी देण्याचा मार्ग या धोरणातून खुला करण्यात आला. मात्र कायदेशीर नळजोडणी मिळविण्याचा मार्ग उपलब्ध असतानाही काही झोपडीधारक, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, कारखानदार आणि गोदाम मालकांकडून थेट जलवाहिनीला हात घालून पाणी पळवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in