
आज मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. फक्त मुंबईच नव्हे तर ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावरून आता हवामान खात्याने महत्त्वाची बातमी दिली आहे. हवामान खात्यांच्या माहितीनुसार, राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे असून येत्या काही दिवसांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, हवामान खात्याने गारपीटही होणार असल्याची माहिती दिली.
पुढील ३ दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा ग्रामीण भागांमध्ये देण्यात आला आहे. तसेच, काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याचे आव्हान हवामान खात्याने केले आहे.
आज सकाळपासूनच मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली परिसरात काल रात्रीपासून अधुनमधून रिमझिम पाऊस सुरु आहे. तर ठाणे, दिवा,डोंबिवली, कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात गुरुवारी सकाळपासून रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली होती. अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले. तसेच, १५ ते १८ मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीटी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.