मुंबई : वेब सीरिजचा सहाय्यक दिग्दर्शक 'सेक्सटोर्शन रॅकेट'चा बळी, न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने उकळले पैसे

डेटिंग अ‍ॅपवरील जान्हवी नावाच्या महिलेने फसवले, न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची दिली धमकी
मुंबई : वेब सीरिजचा सहाय्यक दिग्दर्शक 'सेक्सटोर्शन रॅकेट'चा बळी, न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने उकळले पैसे

मुंबई : एका वेब सीरिजचा सहाय्यक दिग्दर्शक 'सेक्सटोर्शन रॅकेट'ला बळी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डेटिंग अ‍ॅपवर ओळख झालेल्या एका महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपला नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन पैसे उकळले, अशी तक्रार सहाय्यक दिग्दर्शकाने मुंबईच्या मालवणी पोलीस स्थानकात केली आहे. पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून तपास सुरू आहे.

माहितीनुसार, 46 वर्षीय सहाय्यक दिग्दर्शक गेल्या आठवड्यात (13 डिसेंबर) पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका नातलगाच्या लग्नासाठी गेला होता. यादरम्यान त्याने एक डेटिंग अ‍ॅप डाउनलोड केले. अ‍ॅपवर स्वतःची जान्हवी म्हणून ओळख सांगणाऱ्या एका महिलेशी त्याचे संभाषण सुरू झाले. तिच्याशी वारंवार चॅटिंग सुरू होते. अशातच महिलेने एकदा त्याला व्हिडिओ कॉल केला. महिलेने तिचे सर्व कपडे काढले आणि तक्रारदारालाही त्याचे कपडे काढण्यास प्रवृत्त केले. तिने त्याच्या नकळत हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला होता.

दुसऱ्या दिवशी तक्रारदाराला व्हॉट्सअ‍ॅपवर दोन अनोळखी नंबरवरून महिलेसोबतच्या नग्न व्हिडिओ क्लिप पाठवण्यात आल्या. त्यासोबत, 75,000 रुपयांची मागणी करणारा मेसेज देखील पाठवला. पैसे न दिल्यास व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली होती, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. मी घाबरलो होतो, त्यांना पैसे कमी करण्यास सांगितले आणि नंतर त्यांनी दिलेल्या बँक खात्यात 35 हजार रुपये पाठवले. मात्र, आरोपींनी आणखी पैशांची मागणी सुरू केल्याने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला, असे तक्रारकर्त्याने सांगितले.

"तक्रारीवरून आयपीसीच्या कलम 385, 34, 506, 66(ई), 66(डी), आणि 66(ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत," असे मालवणी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in