

मुंबई : पश्चिम रेल्वेने १ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत आपल्या नेटवर्कवर केलेल्या १८,६१० पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ता चाचण्यांमध्ये १००% यश मिळवल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये ‘रेसिड्युअल क्लोरीन’ आणि जिवाणूविषयक प्रदूषणाबाबतच्या चाचण्यांचा समावेश होता. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या चाचण्यांचे निकालानुसार, संबंधित कालावधीत घेतलेले पाण्याचे नमुने सर्व निर्धारित मानकांवर उत्तीर्ण झाले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागाने पाणी निर्जंतुकीकरणाची परिणामकारकता तपासण्यासाठी १५,९३६ ‘रेसिड्युअल क्लोरीन’ चाचण्या केल्या, ज्यामध्ये सर्व नमुने यशस्वी ठरले. याव्यतिरिक्त, सूक्ष्मजीवविषयक सुरक्षितता तपासण्यासाठी २,६७४ जिवाणूविषयक चाचण्या करण्यात आल्या; यामध्येही १००% यश मिळाले. ही देखरेख रेल्वे स्थानके आणि रेल्वे वसाहतींमधील पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर करण्यात आली होती.
या दोन प्रकारच्या चाचण्यांचे उद्देश वेगवेगळे आहेत. ‘रेसिड्युअल क्लोरीन’ चाचणीद्वारे पाण्यात निर्जंतुकीकरणासाठी पुरेसे क्लोरीन शिल्लक आहे का, हे तपासले जाते; तर जिवाणूविषयक विश्लेषणाद्वारे आरोग्यास घातक ठरू शकणारे सूक्ष्मजीव शोधले जातात. नियमित चाचण्यांचा उद्देश संभाव्य दूषितता ओळखणे आणि पिण्याचे पाणी वापरासाठी सुरक्षित असल्याची खात्री करणे हा आहे.
पश्चिम रेल्वेने सांगितले की, या कार्यक्रमात नियमित नमुने गोळा करणे, प्रयोगशाळेत विश्लेषण करणे, तसेच पर्यवेक्षण आणि समन्वयाचा समावेश होता. त्यांची जबाबदारी केवळ प्रवासी सेवांपुरती मर्यादित नसून, रेल्वे वसाहतींमध्ये राहणारे रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य व कल्याण जपण्याचीही आहे.
रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय विभाग भविष्यातही पाणी गुणवत्ता तपासणी सुरू ठेवेल आणि संपूर्ण नेटवर्कवर स्वच्छतेचे मानक कायम राखेल.
सातत्याने चाचण्या आवश्यक
हे निकाल संबंधित कालावधीतील पाणी गुणवत्तेची स्थिती दर्शवतात. मात्र, साठवण टाक्या, पाइपलाइन किंवा वितरण प्रणालीमध्ये दूषितता निर्माण होऊ शकत असल्याने, नियमित देखरेख अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे, प्रवासी आणि रेल्वे वसाहतींमधील रहिवाशांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने चाचण्या करणे आवश्यक आहे.