

मुंबई : उपनगरीय, मेल/एक्स्प्रेसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेमध्ये पश्चिम रेल्वेने १२१ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. तर एसी लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून २ कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.
पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रामाणिक प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास करता यावा यासाठी मुंबई उपनगरीय लोकल, मेल/एक्स्प्रेस तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आली.
तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अनेक तपासणी मोहिमा राबविल्या. यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १२१.६७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही रक्कम गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ५१ टक्के पेक्षा जास्त आहे. तसेच रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा १४ टक्के पेक्षा जास्त आहे.
ऑक्टोबर महिन्यात ३.३९ लाख तिकीट नसलेल्या प्रवाशांना शोधून २४.२० कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. ज्यामध्ये बुक न केलेल्या सामानाच्या केसेसचा समावेश आहे. तर एसी लोकल ट्रेनमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान जवळजवळ ६२ हजार अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २.०२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा जवळजवळ ७६ टक्के जास्त आहे.