पश्चिम रेल्वेवर हमालांचा ‘एल्गार’; कारवाईमुळे बक्कल केले परत

पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांमध्ये काम करणाऱ्या हमालांना अधिकाऱ्यांकडून सापत्न वागणूक देण्यात येत आहे. एका हमालाचे १८० दिवसांचे निलंबन केल्यानंतर काही हमालांचे बक्कल्स जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांमध्ये काम करणाऱ्या हमालांना अधिकाऱ्यांकडून सापत्न वागणूक देण्यात येत आहे. एका हमालाचे १८० दिवसांचे निलंबन केल्यानंतर काही हमालांचे बक्कल्स जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे हमालांनीही आपले बक्कल समर्पित केले होते. या प्रकरणात पश्चिम रेल्वे भारतीय कामगार सेनेने मध्यस्थी केल्यानंतर प्रशासनाने नमते घेत हमालांचे बक्कल परत केले.

पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंटल, दादर, वांद्रे, बोरिवली या प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये अधिक संख्येने हमाल काम करतात. हमालांना असंख्य अडचणी येत असून त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्यापासून शौचालयाच्या अडचणींना हमालांना सामोरे जावे लागत आहे. यासह हमालांना पुरेसा आराम करण्यासाठी किंवा बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही. पावसाळ्यात काम करताना हमालांची दमछाक होते. काही दिवसांपूर्वी मुंबई सेंट्रल येथे काम करताना हमालाचा एका अधिकाऱ्याला धक्का लागला होता. या घटनेमुळे संबंधित हमालाचे १८० दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. तर दुसऱ्या एका कारवाईत ७ ते १५ हमालांचे बक्कल जप्त करण्यात आले होते. याचा निषेध म्हणून उर्वरित हमालांनीही आपले बक्कल समर्पित केले होते.

पश्चिम रेल्वे भारतीय कामगार सेनेकडे यासंदर्भातील तक्रार आल्यानंतर सेनेने या प्रकरणात लक्ष घातले होते. संघटनेने प्रशासन आणि हमाल यांच्यात मध्यस्थी करत जप्त करण्यात आलेले बक्कल परत मिळतील याची खात्री करण्यात आली, असे कामगार सेनेकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in