

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली - बोरिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी मंगळवारी मध्यरात्री रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी सुमारे २८८ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत.
कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या उभारणीसाठी २० डिसेंबरपासून १८ जानेवारी २०२६ पर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे शेकडो लोकल सेवा रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे तर मंगळवार-बुधवारी ब्लॉक असल्याने या दिवशी लोकल सेवा कमी होतील. कांदिवली ते मालाड स्थानकांदरम्यान पॉइंट १०३ तोडण्यासाठी मंगळवारी रात्री मोठा ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक अप जलद मार्गावर रात्री १२ ते पहाटे ५.३० आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १ ते पहाटे ४.३० पर्यंत असेल तसेच कांदिवली आणि मालाड स्थानकांदरम्यान पॉइंट १०२ तोडण्यासाठी एक मोठा ब्लॉक घेतला जाईल. हा ब्लॉक अप जलद मार्गावर बुधवारी रात्री १२ ते पहाटे ५.३० आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १ ते पहाटे ४.३० पर्यंत असेल. पाचव्या मार्गावरील निलंबन आणि वेग निर्बंधांमुळे, लोकल सेवा रद्द केल्या जातील तर अप जलद मार्गावरील काही मेल/एक्सप्रेस पर्यायी मार्गावर वळवण्यात येतील.