

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात ऑक्टोबर महिन्यातील कडक ऊन आणि उष्णतेमुळे त्रासलेल्या ७५ हून अधिक वन्यजीव आणि पक्ष्यांची महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या समन्वयाने एका स्वयंसेवी संस्थेने सुटका केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
‘रेशिंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर’चे संस्थापक-अध्यक्ष आणि मुंबईचे मानद वन्यजीव वार्डेन पवन शर्मा यांनी सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये १२ हून अधिक प्रजातींचे साप, घोरपड, फ्लॅपशेल कासव, बोनेट आणि रेसस मॅकाक (माकडे), हनुमान लंगूर, खारी, मुंगूस, वटवाघुळ यांसारख्या सस्तन प्राण्यांचा, तसेच घार, घुबड, पोपट, कोकिळा, बलाक (हिरॉन) आणि बगळे या पक्ष्यांचा समावेश आहे.
शर्मा पुढे म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये त्रस्त आणि जखमी वन्यजीवांना मदत करण्यासाठी आमची पथके चोवीस तास कार्यरत आहेत. आमच्या दोन्ही रुग्णवाहिका न थांबता अहोरात्र चालू असून, त्यांनी चारही जिल्ह्यांमध्ये विविध वन्यजीवांना वाचवले आहे. मुख्यतः ऑक्टोबरच्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या या वन्यजीवांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी समर्पित बचावकर्ते, पशुवैद्य आणि पुनर्वसन तज्ञांचे पथक अहोरात्र मेहनत घेत असल्याचे अधिकाऱ्याने शेवटी सांगितले.