
देवश्री भुजबळ/मुंबई
शहरात सध्या तापमानाचा पारा किंचित वाढलेला असला तरीही येत्या काही दिवसांत तापमान कमी होणार आहे. या आठवड्यात शहरातील तापमान २० अंश राहण्याची शक्यता असून ३१ डिसेंबरला मुंबई शहराला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे. या दिवशी किमान तापमान १६ अंशांपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे.
शुक्रवारी सांताक्रुझ वेधशाळेने शहरातील किमान तापमान १८.५, तर कमाल ३०.८ अंश नोंदवले, तर कुलाबा वेधशाळेने किमान २१.१, तर कमाल २९.९ अंश तापमानाची नोंद केली.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत १९ अंश इतके तापमान घसरण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबरला हेच तापमान १६ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत तापमान १६ अंश राहण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना कडाक्याची थंडी अनुभवता येणार आहे. या काळात आकाश निरभ्र राहील.
भारतीय हवामान खात्याचे मुंबई संचालक सुनील कांबळे म्हणाले की, तापमान अचानक वाढणे किंवा कमी होणे हे मुंबईत स्वाभाविक आहे. उत्तरेकडून येणारे वारे अतिशय थंड आहेत. त्यामुळे तापमानात घट होते. त्यामुळे येते काही दिवस शहरातील किमान तापमान १६ ते १७ अंश राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान ३० अंश राहील.
यंदाचा डिसेंबर महिना ठरला सर्वाधिक थंड
यंदाचा डिसेंबर महिना हा सर्वाधिक थंडीचा महिना ठरला. यंदाच्या डिसेंबरमध्ये किमान तापमान १३.७ अंश नोंदवले गेले आहे. गेल्या नऊ वर्षांतील हे सर्वात किमान तापमान होते.
अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता
पुणे, धुळे, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, अमरावती आदी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मात्र, मुंबईत पावसाची शक्यता नाही.