

मुंबईची रहिवासी असलेल्या मानसी होडवडेकर या बाईकर तरुणीने, माहीममधील वाहतुकीतून दुचाकी चालवत असताना आलेला छेडछाडीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इन्स्टाग्रामवरील ‘thelazysoul’ या अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मानसीने सांगितले की, एका संध्याकाळी बाईक चालवत असताना ती सिग्नलवर थांबली होती. यावेळी दुसऱ्या बाईकवरून आलेल्या एका तरुणाने तिच्याशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे बोलणे सामान्य वाटत होते. वारंवार मागून येऊन “बाईक चांगली आहे”, “तू छान चालवतेस” अशा कमेंट्स त्याने केल्या. मात्र काही वेळातच त्याचे बोलणे अस्वस्थ करणारे झाले, असे मानसीने सांगितले.
...तर माझी प्रतिक्रिया वेगळीच असती
मानसीच्या म्हणण्यानुसार, त्याने तिला, “घर कुठे आहे तुझं?” असा प्रश्न विचारला. मात्र त्या क्षणी हा प्रश्न तिला स्पष्ट ऐकू आला नाही. फक्त कुजबुज ऐकू आल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मानसीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी ट्रॅफिकमधून मार्ग काढत होते, तेव्हा हा माणूस जवळ आला. सुरुवातीला सगळं ठीक होतं - ‘बाईक चांगली आहे, छान चालवतेस’ वगैरे तो म्हणाला. पण नंतर त्याने नको त्या टिप्पणी केल्या. ‘घर कुठे आहे तुझं’ असं तो म्हणाला, ते त्या क्षणी मला नीट ऐकू आलं नाही. व्हिडिओ पुन्हा पाहताना मला ते लक्षात आलं. तेव्हा फक्त कुजबुज ऐकू आली होती आणि मी दुर्लक्ष केलं. जर तेव्हा स्पष्ट ऐकलं असतं, तर माझी प्रतिक्रिया वेगळीच असती.”
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महिला सुरक्षेबाबत, विशेषतः रस्त्यांवर आणि ट्रॅफिक सिग्नलवर महिलांना भेडसावणाऱ्या अशा अनुभवांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.