

देवश्री भुजबळ
मुंबई : हवामानात बदल होत असतानाच शहरातील बांधकामांच्या कामांनाही वेग आला असून, त्याचा परिणाम पुन्हा एकदा मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर होऊ लागला आहे. गुरुवारी मुंबईचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १२० नोंदवला. अवघ्या ४८ तासांत त्यात ४३ अंकांची घसरण झाली. शहरातील अनेक भागांमध्ये एक्यूआय १५०च्या वर नोंदवण्यात आला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सायंकाळपर्यंत मुंबईतील सर्वाधिक खराब हवा असलेल्या भागांमध्ये वरळीचा एक्यूआय १६४ नोंदवण्यात आला. त्यापाठोपाठ देवनार १५४ आणि नेव्ही नगर-कुलाबा १५१ असा एक्यूआय नोंदवण्यात आला. याशिवाय वांद्रे पूर्व येथे १४७, माझगाव १४२, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स १३०, कुर्ला १२८ आणि चेंबूर येथे १२६ एक्यूआय नोंदवण्यात आला.
सीपीसीबीच्या एक्यूआय बुलेटिननुसार, मुंबईतील एकूण ३० निरीक्षण केंद्रांपैकी गुरुवारी केवळ २० केंद्रे कार्यरत होती. हवेची गुणवत्ता खालावत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेने २ ऑक्टोबर रोजी ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा-२०२६’ जाहीर केला आहे. शहरातील प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर नियंत्रण आणणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हा या आराखड्याचा उद्देश आहे.
या कृती आराखड्यांतर्गत प्रत्येक विभागात किमान १० वायू प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित केले जाणार आहेत. या हॉटस्पॉटची अद्ययावत यादी आणि नकाशे तयार करून नियमितपणे देखरेख केली जाणार आहे. मोठे बांधकाम व पुनर्विकास प्रकल्प, पायाभूत सुविधांची कामे, उघड्यावर कचरा जाळण्याची ठिकाणे, बांधकामाचा राडारोडा टाकण्याची ठिकाणे तसेच वाहतूक कोंडीची ठिकाणे या हॉटस्पॉट मॅपिंगमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.
‘धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम आणि पाडकामाच्या ठिकाणी २८ कलमी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे की नाही, यावर आमचे लक्ष आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल आणि त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास काम बंद करण्याची नोटीस दिली जाईल,’ अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
पावसाळ्यानंतर साचलेला चिखल, गाळ आणि धूळ हटवण्यासाठी महापालिकेने ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत ‘पावसाळ्यानंतर सखोल स्वच्छता मोहीम’ हाती घेतली आहे. प्रमुख रस्ते, दुभाजक, चौक आणि रस्त्यांच्या कडांना या मोहिमेत विशेष प्राधान्य दिले जाणार असून, स्वच्छतेसाठी पुनर्वापर केलेले पाणी किंवा मिस्टिंगचा वापर केला जाणार आहे.
महापालिका सातत्याने एक्यूआयवर लक्ष ठेवणार असून, प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती आराखडा (ग्रॅप) अंतर्गत उपाययोजना करण्यात येणार आहेत. एखाद्या निरीक्षण केंद्रावरील एक्यूआय सलग तीन दिवस ३००च्या वर राहिल्यास, त्या केंद्राच्या दोन किलोमीटरच्या परिसरातील प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कामांवर, त्यात सर्व बांधकाम कामांचाही समावेश आहे, स्थगिती आणण्याची तरतूद ‘ग्रॅप’मध्ये आहे.
कंत्राटदार, विकासकावर स्वच्छतेची जबाबदारी
यंदा धूळ प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विकासक आणि कंत्राटदारांवर त्यांच्या प्रकल्पाच्या आकारानुसार लगतचे रस्ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ४,००० चौरस मीटरपर्यंतच्या प्रकल्पांना लगतचे १०० मीटर रस्ते स्वच्छ ठेवावे लागतील. ४,००० ते १०,००० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या प्रकल्पांना २०० मीटर, तर १०,००० चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांना दोन्ही बाजूंना ५०० मीटरपर्यंतचे रस्ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असेल.