
मुंबादेवी मंदिराकडे जाणारा झवेरी बाजार मार्ग पहिल्यांदाच पूर्णपणे पादचारी मार्गात रूपांतरित करण्यात आला आहे. 'झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिव्हल २०२५'च्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नेहमी वाहनांच्या आणि विक्रेत्यांच्या गर्दीने गजबजलेले हे मार्केट आता रेड कार्पेट टाकलेले, झगमगत्या दिव्यांनी उजळलेले, फुलांच्या सजावटींनी नटलेले आणि अनेक फोटो बूथ्सने सजलेले आहे. त्यामुळे खरेदीदार आणि पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे.
बॅटरी कार सेवेचीही सोय
उत्सवाच्या वातावरणाचा आनंद घेता यावा यासाठी ज्यांना चालायला त्रास होतो, अशा लोकांसाठी बॅटरी कार सेवेचीही सोय करण्यात आली आहे. मुंबईतील सर्वात जुन्या व्यावसायिक भागांपैकी एक असलेल्या या परिसरात स्वच्छता, सुव्यवस्था आणि उत्सवाचे वातावरण निर्माण केल्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वच्छतेबद्दल कौतुक, मजेशीर प्रतिक्रियेनेही वेधले लक्ष
इंटरनेटवर एका एक्स (X) वापरकर्त्याने लिहिले, "मुंबादेवीकडे जाणारा झवेरी बाजार हा रस्ता पहिल्यांदाच फक्त पादचाऱ्यांसाठी खुला आहे. कार्पेट टाकलेला...सुंदर रोषणाईने सजवलेला.... चालण्याचा त्रास असलेल्यांसाठी बॅटरी कार सेवा उपलब्ध आहे. फेरीवाले नाहीत. स्वच्छ. अविश्वसनीय." इतर अनेकांनीही अशाच प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिले, “आम्ही मागच्या आठवड्यात गेलो होतो आणि चालताना खूप छान वाटले. बॅटरी कार सेवाही उपयोगी ठरली, पण नंतर टॅक्सी मिळायला १५ मिनिटे लागली आणि चालकाने दुप्पट भाडे घेतले.” गर्दीचे व्यवस्थापन करण्यात आणि स्वच्छता राखण्यात मदत करणाऱ्या मुंबादेवी स्वयंसेवकांच्या प्रयत्नांचेही अनेकांनी कौतुक केले.
नेटकऱ्यांच्या बहुतेक प्रतिक्रिया सकारात्मक असल्या तरी एका वापरकर्त्याने विनोदी शैलीत लिहिले, “सोने १,३०,००० रुपयांवर गेल्यावर खरेदीदारांना आकर्षित करायला फक्त लाल कार्पेटच उपयोगी पडणार! कार्पेट आणि लाईटिंगचा खर्चही आता मेकिंग चार्जमध्येच समाविष्ट असणार!”
झवेरी बाजारचा ७५ वर्षांचा उत्सव
झवेरी बाजाराच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त व्यापारी, दुकानदार आणि स्थानिक लोक एकत्र हा उत्सव साजरा करीत आहेत. रात्रीच्या वेळी हा बाजार खूपच लक्षवेधी दिसतो, दिवाळीचे दिवे आणि फुलांच्या कमानींमुळे पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधला आहे.