राणी बागेतील रुद्र वाघाचा मृत्यू; सलग दोन वाघांच्या मृत्यूबाबत प्रशासनाची लपवाछपवी

शक्ती नावाच्या वाघाचा संशयास्पद मृत्यू होण्यापूर्वी त्याचा बछडा रुद्र या वाघाचा मृत्यू झाला आहे. रुद्र हा शक्ती आणि करिश्मा यांचा ३ वर्षाचा बछडा होता. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर रुद्र वाघाच्या मृत्यूची बातमी समाजमाध्यमातून समोर आल्याने राणी बाग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : राणीची बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात शक्ती नावाच्या वाघाचा संशयास्पद मृत्यू होण्यापूर्वी त्याचा बछडा रुद्र या वाघाचा मृत्यू झाला आहे. रुद्र हा शक्ती आणि करिश्मा यांचा ३ वर्षाचा बछडा होता. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर रुद्र वाघाच्या मृत्यूची बातमी समाजमाध्यमातून समोर आल्याने राणी बाग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे राणी बाग प्रशासनाचे अधिकारी वाघांच्या मृत्यूबाबत लपवाछपवी का करत आहेत? असा संतप्त सवाल व्याघ्रप्रेमी करत आहेत.

राणी बागेतील शक्ती वाघाच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रशासनावर टीकेची आगडोंब उठलेली असताना, व्याघ्रप्रेमींनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याची टीका केली होती. त्यातच आता शक्ती वाघाच्या बचड्याच्याही मृत्यू २९ ऑक्टोबरला झाल्याची माहिती समोर आहे. रुद्र हा केवळ ३ वर्षांचा होता. तर त्याला जन्मापासूनच आजार असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, रुद्र वाघाच्या आजाराबाबतची माहिती का लपवण्यात आली, असा संतप्त सवाल व्याघ्रप्रेमी करत आहेत. तर यासंदर्भात प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी समोरून दाद दिली नाही.

शक्ती तसेच रुद्र वाघाच्या मृत्यूनंतर व्याघ्र प्रेमी प्रथमेश जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. “मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून शक्ती वाघाच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. त्याचा मृत्यू संशयास्पद झालेला आहे. प्राणीसंग्रहालय प्रशासन व त्याच्यावरती उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा झाल्याने हा मृत्यू झाला आहे. शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना प्रसिद्ध न करणे, त्याची माहिती न देणे, यामागचे नेमके काय कारण आहे, हे सर्व लपवून का ठेवण्यात आले, त्यामागे काय कारण होते?” असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला.

वाघांच्या मृत्यूची माहिती गुलदस्त्यात?

व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाचा मृत्यू झाला तर वनविभाग त्याची बातमी दुसऱ्या दिवशी जाहीर करते, पण रुद्र आणि शक्ती वाघाचा मृत्यू होऊन महिना-पंधरा दिवस होऊनही प्रशासनाने माहिती जाहीर का केली नाही? तसेच, रुद्र वाघ आजारी असताना त्याची वाच्यता कुठेही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही वाघांच्या मृत्यूमागे प्रशासनाचा हात आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली, याचे काय कारण आहे, असा सवालही व्याघ्रप्रेमींनी उपस्थित केला आहे.

नागझिरा-संरक्षित क्षेत्रात वाघाचा मृत्यू

गोंदिया: नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात गुरुवारी दोन वाघांच्या संघर्षात एका वाघाचा मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत एका वाघाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in