

मुंबई : मुंबई हे महानगर कोट्यवधी नागरिकांना आपल्यामध्ये सामावून घेते. त्यामुळे, या महानगराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करते. मात्र, केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नाहीत. नागरिकांनी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण, सार्वजनिक स्वच्छता हे सामाजिक कर्तव्य आहे, असे आवाहन अभिनेता पद्मश्री अक्षय कुमार यांनी केले आहे.
मुंबई मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नोंदणीला अभिनेता पद्मश्री अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत महानगरपालिका मुख्यालयातून मंगळवारी सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार अमित साटम, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यासह महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर आदी उपस्थित होते.
मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करते. नागरिक म्हणून आपण सहभागी व्हायला हवे. सार्वजनिक स्वच्छतेमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी, त्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी ‘मुंबई क्लीन लीग’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात विविध आस्थापनांसोबत चित्रपट, क्रीडा आदी क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती सहभागी होतील. यामुळे, स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन पर्यायाने स्वच्छता राखण्यास मदत होईल, असेही अक्षयकुमार यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबई क्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ प्रशासकीय विभाग (नगरसेवक गट), स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड), आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी दत्तक घेणे या विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.