मुंबई : बोरिवली येथील एका हॉटेलमध्ये गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दोघा तरुणांना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे ताशेरे ओढत अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
२०१८ रोजी मध्यरात्री बोरिवली (पूर्व) येथील ‘रेजन्सी हॉटेल’मध्ये रवी विरजी पटेल आणि गोपाळ बाबू जाधव हे दोन ग्राहक दारूच्या नशेत गोंधळ घालत असल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना मिळाली होती. जेव्हा पोलीस पथक तिथे पोहोचले, तेव्हा आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा आणला. या झटापटीत आरोपी गोपाळ जाधव याने पोलीस व्हॅनच्या काचेवर डोके आपटून जखमी केले होते, असा दावा पोलिसांनी केला. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवले आणि दोन्ही आरोपींना संशयाचा फायदा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, पोलिसांना दृश्य स्वरूपाची जखम झाली नव्हती. याउलट, आरोपी गोपाळ जाधव याला गंभीर दुखापत होऊन त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. त्याबाबत स्पष्टीकरण पोलीस देऊ शकले नाहीत. हॉटेलमध्ये अनेक ग्राहक उपस्थित असूनही एकाही स्वतंत्र साक्षीदाराची साक्ष नोंदवली नाही. तसेच तांत्रिक पुराव्यांचा अभाव आहे. पोलिसांनी सादर केलेले सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्डिंग न्यायालयात कायदेशीररीत्या सिद्ध होऊ शकले नाही. तसेच या फुटेजमध्ये आरोपी मारहाण किंवा शिवीगाळ करताना दिसले नाहीत, अशा विविध विसंगतींवर बोट ठेवत सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपी तरुणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.