Gudi Padwa 2026 : उद्या स्वागत यात्रांचा मुंबईभर जल्लोष; गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ, खेळांची पर्वणी

प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त मुंबईच्या विविध भागात जोरदार नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहेत. गिरगाव, कुर्ला, दादर, वरळी येथे स्वागतयात्रांची तयारी जोरदार सुरू आहे.
Gudi Padwa 2026 : उद्या स्वागत यात्रांचा मुंबईभर जल्लोष; गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ, खेळांची पर्वणी
Published on

मुंबई : प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त मुंबईच्या विविध भागात जोरदार नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहेत. गिरगाव, कुर्ला, दादर, वरळी येथे स्वागतयात्रांची तयारी जोरदार सुरू आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४८ रोजी गिरगावातील फडके श्रीगणपती मंदिरापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अर्थात गिरगावचा पाडवा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित यात्रेचे हे २४ वे वर्ष आहे. सर्व भारतीयांच्या हृदयभाषेतील मंत्र म्हणजेच वंदे मातरमच्या १५० व्या वर्षानिमित्त ‘वंद्य वंदे मातरम’ अशी यंदाच्या यात्रेची वैशिष्ट्ये आहेत.

यात्रेचा प्रारंभ सकाळी ८ वाजता वि. प. मार्ग, गिरगावच्या फडके श्रीगणपती मंदिरापासून राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि महापौर रितू तावडे यांच्या हस्ते गुढीपूजनाने होईल. ठाकूरद्वार नाका येथे आयोजित केलेल्या संकल्प सभेत चाणक्य मंडळ परिवाराचे अविनाश धर्माधिकारी आणि सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.

अंधेरीचा पाडवा जल्लोषात साजरा होणार

अंधेरी (पूर्व) येथे हिंदू नववर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहात व पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच ‘अंधेरीचा पाडवा’ या नावाने भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने ३५ गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत केले जाणार असून, आकर्षक व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

कुर्ल्याच्या स्वागतयात्रेमध्ये यंदा ‘स्वदेशी’चा जागर

हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समिती, कुर्ला पश्चिमच्या नववर्ष स्वागतयात्रेमध्ये यंदा ‘स्वदेशी’चा जागर करण्यात येणार आहे. टाळ-मृदूंग, लेझिम पथक आणि ढोल ताशांच्या गजरात निघणाऱ्या या नववर्ष स्वागतयात्रेत कुर्ला येथील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. यंदाच्या स्वागतयात्रेत चित्ररथ, जिवंत देखावे, फलक इत्यादी माध्यमांतून स्वदेशी जीवनशैलीचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. भारतीय वातावरणाला अनुसरून पारंपरिक वेशभूषेचे महत्त्व दिले जाईल.

गोरेगावमध्ये शोभायात्रा व पालखी सोहळा

गोरेगावच्या श्री मंगलमूर्ती गणेशभक्त मंडळातर्फे गुढीपाडवानिमित्त ‘भव्य शोभायात्रा व श्रीं’चा पालखी सोहळा आयोजित केला आहे. सकाळी ६.३० वाजता श्रीं ची आरती व ६.४५ वाजता पालखी प्रस्थान सुरू होईल. या शोभायात्रेत वेषभूषा, दिंडी, झांज पथक, लेझीम व पारंपरिक लोककला सादर होणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत प्लॉट क्र. ५, ५/१ व अलंकार व्यापारी संकुल या मुख्य चौकात सादर केले जाणार आहे. सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी पारंपरिक पोशाख परिधान करावा, अशी विनंती श्री मंगलमूर्ती गणेशभक्त मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in