मुंबईकर काम्या ठरली ‘एव्हरेस्ट’वीर; १६ व्या वर्षी केले जगातील सर्वोच्च शिखर सर

१६ व्या वर्षात सध्या मुले-मुली मोबाईलच्या खेळात गुंग झालेले असतानाच मुंबईकर काम्या कार्तिकेयन या बारावीत शिकणाऱ्या मुलीने जगातील सर्वात उंच शिखर ‘एव्हरेस्ट’ला गवसणी घातली आहे.
मुंबईकर काम्या ठरली ‘एव्हरेस्ट’वीर; १६ व्या वर्षी केले जगातील सर्वोच्च शिखर सर
X/@indiannavy
Published on

मेघा कुचिक/मुंबई

१६ व्या वर्षात सध्या मुले-मुली मोबाईलच्या खेळात गुंग झालेले असतानाच मुंबईकर काम्या कार्तिकेयन या बारावीत शिकणाऱ्या मुलीने जगातील सर्वात उंच शिखर ‘एव्हरेस्ट’ला गवसणी घातली आहे. मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रेन स्कूलमध्ये शिकणाऱ्या काम्याने आपले वडील कमोडोर एस. कार्थिकेयन यांच्यासोबत ८,८४९ मीटर उंचीचे हे शिखर मंगळवारी सर केले. हा पराक्रम करणारी काम्या ही जगातील कमी वयाची दुसरी तर भारतातील पहिली मुलगी ठरली आहे. तिने नेपाळच्या बाजूने या शिखरावर चढाई केली.

कमोडोर एस. कार्थिकेयन व काम्या कार्तिकेयन यांनी काठमांडू येथून ६ एप्रिलला मोहिमेची सुरुवात केली. सात आठवड्यांच्या खडतर प्रवासानंतर त्यांनी हे शिखर गाठले. दीड महिन्यांच्या या मोहिमेत वादळी हवामानासह धोकादायक बर्फ पडण्याच्या आव्हानांचा त्यांनी सामना केला. बेस कॅम्पनंतर चार कॅम्प पार करावे लागतात. त्यातील चौथा कॅम्प हा ७,९५० मीटर उंचीवर असून त्याला मृत्यूचा सापळाच म्हटले जाते.

बालशक्ती पुरस्काराने सन्मानित

काम्या हिला पंतप्रधान राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार मिळाला आहे. १८ वर्षांखालील मुलांना देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. काम्याने सातपैकी सहा खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर करण्यासाठी प्रचंड धैर्य दाखवले आहे. येत्या डिसेंबरमध्ये तिने अंटार्क्टिकामध्ये माऊंट विन्सन मॅसिफ शिखरावर पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

०२२ मध्ये प्रसिद्ध गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांच्यासोबत उत्तर अमेरिकेतील डेनाली (६१९० मीटर) शिखर सर केले. त्यावेळी काम्या ही सर्वात लहान व शरद कुलकर्णी हे सर्वात ज्येष्ठ गिर्यारोहक होते. कुलकर्णी यांनी सांगितले की, काम्याला गिर्यारोहण व ट्रेकिंगची आवड असून ती कठोर परिश्रम घ्यायला कायम तयार असते. तसेच आव्हाने स्वीकारायला तिला आवडतात, असे त्यांनी सांगितले.

स्वप्न प्रत्यक्षात उतरले

शिखर सर केल्यानंतर काम्या म्हणाली की, माझे वडीलच माझे गुरू व मार्गदर्शक आहेत. त्यांच्यासोबत हे शिखर सर करणे हे माझ्यासाठी विशेष आहे. त्यांच्यासोबत एव्हरेस्ट चढणे हे सर्वात प्रेमळ स्वप्न होते जे आता सत्यात उतरले आहे. गिर्यारोहणाची प्रेरणा मी वडिलांपासून घेतली. सह्याद्री व प. घाटात तिने तिसऱ्या वर्षापासून, तर वयाच्या सातव्या वर्षापासून हिमालयात ट्रेकिंग सुरू केले. २०१५ मध्ये चंद्रशीला (१२ हजार फूट), २०१६ मध्ये तिने ‘हर की दून (१३,५०० फूट), केदारकांता (१३,५०० फूट), रुपकुंड तलाव (१६,४०० फूट) पार केले. मे २०१७ मध्ये काम्याने ‘एव्हरेस्ट’च्या बेस कॅम्पवर पाऊल ठेवले. हे ठिकाण १७६०० फुटांवर आहे. काम्याने स्तोक कांगरी (२०,१८७ फूट), मे २०१९ मध्ये हिमाचल प्रदेशातील भ्रुगू लेक (१४,१०० फूट), सार पास (१३,८५० फूट) पार केले. तसेच माऊंट कांत यात्से (२१ हजार फूट) सर केले. तसेच २०२० मध्ये दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंचीवरील माऊंट अकॉनग्वा हे शिखर सर केले. तेव्हा ती केवळ १२ वर्षांची होती.

logo
marathi.freepressjournal.in