मुंबईकरांवर आणखी पाणीकपातीचे संकट, धरणात फक्त ६ टक्के पाणीसाठा; पाऊस न पडल्यास अडचणीत वाढ

मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरू झाल्यानंतर आणखी कपात प्रस्तावित आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.
मुंबईकरांवर आणखी पाणीकपातीचे संकट, धरणात फक्त ६ टक्के पाणीसाठा; पाऊस न पडल्यास अडचणीत वाढ
Published on

मुंबई : मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरू झाल्यानंतर आणखी कपात प्रस्तावित आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. ८ जून रोजी सातही धरणांत फक्त ६.१३ टक्के म्हणजेच ८८,६७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. पाऊस वेळीच दाखल न झाल्यास मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला तोंड द्यावे लागण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईची पाण्याची गरज लक्षात घेता, राज्य सरकारने २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला असून तो वापरायला सुरुवात केली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात वरुणराजाची कृपादृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राकडे वरुणराजाने पाठ फिरवली, तर मुंबईत आणखी १० टक्के म्हणजेच २० टक्के पाणीकपात करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४३ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्याने मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू आहे. पुढील काही दिवसांत पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडणे गरजेचे आहे. अन्यथा पाणीकपात वाढू शकते.

८ जून रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा- ०

  • मोडक सागर- २०,१५१

  • तानसा - ३५,२३६

  • मध्य वैतरणा- १७,४९५

  • भातसा- ८,६६०

  • विहार- ५,०११

  • तुळशी - २,१२५

तीन वर्षांची ८ जूनची स्थिती

  • २०२४ ८८,६७९ दशलक्ष लिटर ६.१३ टक्के

  • २०२३ १,५७,८१४ दशलक्ष लिटर १०.९० टक्के

  • २०२२ २,१२,४६२ दशलक्ष लिटर १४.६८ टक्के

logo
marathi.freepressjournal.in