
मुंबई : गुढीपाडव्यासाठी मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्यित महिला बचत गटांनी सुरू केलेल्या 'पुरणपोळी महोत्सव'ला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. गुढीपाडव्याच्या दिवशी ५० बचत गटांना मिळून साडेतीन हजारांपेक्षा अधिक पुरणपोळ्यांची ऑनलाइन मागणी नोंदवली गेली. विशेष म्हणजे या सर्व पुरणपोळ्या घरपोच मिळाल्यामुळे मुंबईकरांनी बचत गटांच्या सेवेचे कौतुक केले.
मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या ५० बचत गटांना एकत्र आणून गुढीपाडव्यासाठी ‘पुरणपोळी महोत्सव’ उपक्रम राबविण्यात आला. ज्यांना पुरणपोळी हवी होती त्यांच्यासाठी https:// shgeshop.com या संकेतस्थळावर मागणी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. संकेतस्थळावर मागणी नोंदविल्यानंतर आपल्या नजीकच्या चार किलोमीटर परिसरातील महिला बचत गटाकडे याची नोंद झाली. त्यानंतर मागणी नोंदविलेल्या मुंबईतील ग्राहकांना गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी घरपोच उपलब्ध करून देण्यात आली.
महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी मुंबई महानगरपालिका महिलांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. त्यामुळे बचत गटांना रोजगार उपलब्ध होतो. त्याचाच एक भाग म्हणून यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध बचत गटांना पुरणपोळी महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले. या उपक्रमाला मुंबईकरांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे बचत गटांचा हुरूप अधिक वाढला आहे.
नियोजन विभागाचे व्यावसायिक प्रशिक्षण
पुरणपोळी महोत्सवातील ५० बचत गटांनी एसएचजी ई शॉप या संकेतस्थळाद्वारे खवय्यांसाठी घरपोच पुरणपोळी पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने या उपक्रमासाठी पूर्वतयारी केली होती. संबंधित बचत गटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले होते. आपल्याकडे आलेली मागणी कशा पद्धतीने नोंद करून ठेवायची, त्यानंतर दर्जा आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळून स्वादिष्ट पुरणपोळी ग्राहकाला कशी घरपोच पाठवायची, याबाबतही नियोजन विभागाने बचत गटातील महिलांना नि:शुल्क मार्गदर्शन केले. आपल्या उत्पादनांना बाजारपेठ कशी उपलब्ध मिळू शकते, बाजारात मागणी असल्यास त्या पद्धतीने पुरवठा कसा करावा, याचेही प्रशिक्षण बचत गटांना देण्यात आले होते.