मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले; पाणीपट्टीत होणार ७.१२ टक्के वाढ

तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर शुद्ध पाणीपुरवठा होतो.
मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले; पाणीपट्टीत होणार ७.१२ टक्के वाढ
Published on

वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच मुंबई महापालिका प्रशासनाने आता पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२-२३ साठी पाण्याच्या बिलात तब्बल ७.१२ टक्के वाढ केली असून १६ जून २०२२ पासून ही दरवाढ लागू होणार आहे. घरगुतीसह व्यवसायिकांना ही दरवाढ नोव्हेंबर महिन्यापासून लागू होणार असून २०२२-२३ मध्ये ९१.४६ कोटींचा महसूल अपेक्षित आहे. दरम्यान, पाणी पट्टीत वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ऐन महागाईत मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर शुद्ध पाणीपुरवठा होतो. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला वर्षांला कोट्यवधींचा खर्च येतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याला लाभ मिळणाऱ्या प्रकाराप्रमाणे पालिकेकडून प्रत्येकी एक हजार लिटरमागे पाणीपट्टी आकारली जाते. महापालिकेने २०१२ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी किमान ८ टक्के पाणीपट्टी वाढवता येते. मात्र २०२० मध्ये कोरोनामुळे पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती.मात्र गेल्या वर्षी २०२१ ला ५.२९ टक्क्यांनी पाणीपट्टी वाढवण्यात आली होती.

अशी होणार पाणीपट्टीत वाढ!

नव्या पाणीपट्टी वाढीनुसार प्रति एक हजार लिटरमागे झोपडपट्टी विभागाची पाणीपट्टी ४.९३ रुपयांवरून ५.२८ रुपये होणार आहे. इमारतींची पाणीपट्टी ५.९४ रुपयांवरून ६.३६ रुपये होणार आहे. नॉन कमर्शिअल विभागाची पाणीपट्टी २३.७७ रुपयोवरून २५.२६ रुपये होणार आहे. व्यवसायिक विभागात ४४.५८ रुपयांवरून ४७.६५ रुपये होणार आहे. उद्योग कारखान्यांसाठी ५९.४२ रुपयांवरून ६३.६५ रुपये आणि रेसकोर्स व फाइव्ह स्टार हॉटेलसाठी ८९.१४ रुपयांवरून ९५.४९ इतकी पाणीपट्टी वाढणार आहे. दरम्यान, मलनिस्सारण प्रती एक हजार लिटर साठी ४.७६ रुपये आकारण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा खर्चात वाढ

आस्थापना खर्च ५१८ वरून ५७७ रुपयांपर्यंत वाढला आहे. तर प्रशासकीय खर्च १२५ रुपयांवरून घटून ८५ रुपये झाला आहे. मात्र विद्युत खर्च २२१ रुपयांवरून २२२ रुपये झाला आहे. तर सरकारी तलावांतून घेण्यात येणार्‍या पाण्याचा खर्च ८७ रुपयांवरून १०१ रुपये झाला आहे. तर इतर प्रचालन व परीरक्षण खर्च ८१ रुपयांवरुन १२०.४८ टक्के झाला म्हणजेच ४८.७४ टक्क्यांनी वाढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in