मुंबईकर नागरिकांनी आपापल्या स्तरावर प्रदूषण नियंत्रणासाठी हातभार लावावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

हवा प्रदूषणमुक्‍तीसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्‍या विविध उपाययोजना समाधानकारक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईकर नागरिकांनी आपापल्या स्तरावर प्रदूषण नियंत्रणासाठी हातभार लावावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

मुंबईकरांची हवा प्रदूषणापासून सुटका करण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रभावीपणे विविध उपाययोजना राबवत आहे. स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी - कर्मचारी, कामगार रस्‍त्‍यावर उतरुन अहोरात्र कार्यरत आहेत. रस्‍ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी धूळ हटवून पाण्याने धुण्‍याचे काम अखंडपणे सुरू आहे. एकूणच, बृहन्‍मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्‍या विविध उपाययोजना समाधानकारक आहेत, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महानगरपालिकेने सुरू केलेल्‍या या स्‍वच्‍छता मोहीमेला आता लोकचळवळीचे स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे. सर्व नागरिकांनी त्यात योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्‍यमंत्र्यांनी यानिमित्ताने केले आहे.

वातावरणीय बदलांमुळे मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढलेले हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निरनिराळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. या उपाययोजनांची तसेच सार्वजनिक स्वच्छता कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दिनांक २१ नोव्‍हेंबर २०२३) भल्या पहाटेपासून पाहणी केली.

या पाहणीप्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे, डी विभाग सहायक आयुक्त शरद उघडे, एच पूर्व विभाग सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिम विभाग सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पूर्व विभाग सहायक आयुक्त मनीष वळंजू तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी डी विभागामध्ये पेडर रोड येथे दुभाजक स्वच्छता कामाची पाहणी करून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. एच पूर्व विभागामध्ये कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भूयारी मार्ग परिसर; के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल आणि त्यानंतर एच पश्चिम विभागामध्ये जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग आदी ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी रस्ते, पदपथ स्वच्छता तसेच धूळ प्रतिबंधक कामांची पाहणी केली. दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रस्ता स्थित जॉगर्स पार्क येथे भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद देखील साधला.

या पाहणी दौऱयात ठिकठिकाणी पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला तपशीलवार निर्देश दिले. तसेच, प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्रीची संख्या वाढवण्याची सूचना देखील त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व कार्यवाही सुरु असून आज दिलेल्या सूचना देखील तातडीने अंमलात आणल्या जातील, अशी ग्वाही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रशासनाच्या वतीने दिली.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले की, नागरी आरोग्याच्या दृष्टिने प्रदूषण ही मोठी समस्‍या आहे. वातावरणातील बदलांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले असताना महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासनाला सूचना दिल्या होत्या की, संपूर्ण मुंबई महानगरामध्ये अधिकचे मनुष्‍यबळ व संयंत्रे नेमावित आणि धूळ नियंत्रणावर भर द्यावा. त्यानुसार, रस्ते, पदपथ व सार्वजनिक ठिकाणी साचलेली धूळ ब्रशने हटवून त्यानंतर पाण्याने धुवून स्वच्छता केली जात आहे. अपेक्षित अशी कामे होत असल्याचा आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. फॉगर, ऍन्टी स्मॉग व इतर संयंत्राचा उपयोग केला जात आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील धूलिकण कमी होत आहेत. आता एक हजार टँकर भाडेतत्‍त्‍वावर घेवून संपूर्ण मुंबईतील रस्ते, पदपथ, चौक आदी आलटून पालटून एक दिवसाआड धुवावेत, त्यामुळे धुळीचे प्रमाण अत्यंत कमी होईल. तसेच, ज्‍या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, त्‍या सर्व ठिकाणी ग्रीन पडदा लावण्यात येत आहे. त्‍याचबरोबर फॉगर, स्प्रींकलर लावण्‍याचे आदेशही महानगरपालिकेने दिले आहेत. एकूणच, सर्व उपाययोजना आता अंमलात आल्या आहेत, त्याचे समाधान आहे, असे मुख्यमंत्री महोदयांनी नमूद केले. मुंबईतील सर्व विकासक व बांधकाम व्यावसायिकांनी देखील सर्व उपाययोजना करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, मुंबई महानगरात पायाभूत विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्‍यात मेट्रो, बुलेट ट्रेन, एमटीएचएल यासह इतरही कामांचा समावेश आहे. ही कामे सुरु ठेवणे जितके आवश्यक आहे तितकेच प्रदूषण नियंत्रण देखील आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पायाभूत प्रकल्पांना देखील प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. फक्त पहाटे नाही तर दिवसभरामध्ये मुख्य व मोठ्या नाक्यांवर, मुख्‍य चौकांमध्‍ये फॉगर मशीन्‍स लावण्‍यास सांगितले आहे, जेणेकरून दोन-दोन तासांनी तुषार फवारणी करुन धूळ रोखता येईल. अशा रितीने धूलिकण कमी करण्यासाठी मुंबईत ४० ठिकाणी वॉटर फॉगर आणि ऍन्टी-स्मॉग गन लावण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्‍यास 'क्लाऊड सीडींग' देखील करण्‍याचे नियोजन आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच छोटे रस्ते, गल्ल्या, वसाहती, समुद्र किनारे, नाले आदी ठिकाणी सुद्धा स्वच्छता ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, मुंबईतील कोळीवाडे, समुद्रकिनारे, वर्दळीची ठिकाणे स्‍वच्‍छ ठेवण्‍याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये दिवसातून चार ते पाच वेळा स्‍वच्‍छ करण्‍याबरोबरच निर्जंतुकीकरण करण्‍याची कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले. भविष्यातील कायमस्वरुपी उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबईत वृक्षारोपण अधिक व्‍हावे. शहरी वनीकरणास चालना द्यावी. रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करावे. जिथे-जिथे जागा आहे, तिथे हरितीकरण व हिरवळीचे आच्छादन वाढवावे, असे निर्देशही मुख्‍यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.

स्थानिक नागरिकांशी साधला संवाद-

याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आपापल्या भागातील समस्या देखील मांडल्या. खारदांडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्र आणि नवीन जलवाहिनी या परिसरासाठी अंथरण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर ही समस्या सुटेल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. खार भूयारी मार्ग येथे वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत असल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ही समस्या सोडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने खार भुयारी मार्ग येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर तेथील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल, असे त्यांनी नमूद केले. जॉगर्स पार्क येथे उद्यानातील प्रसाधनगृहांमध्ये शौचकूपांची संख्या वाढवावी, उद्यानामध्ये अधिक झाडे लावून हिरवळ वाढवावी, असे निर्देश देखील मुख्यमंत्री महोदयांनी दिले.

स्वच्छता कामगारांसोबत चहापान-

मुख्यमंत्री शिंदे यांनी या दौऱ्यात स्वच्छतेची पाहणी करताना प्रत्यक्ष स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान केले. राज्य शासनामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सर्व ४६ वस्त्यांमध्ये सर्व नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कासारवाडी वसाहतीपासून त्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. शाळा, दवाखाने, मैदाने यासह आवश्यक त्या सर्व सोयी स्वच्छता कामगारांना, त्यांच्या कुटुंबाला मिळतील. या कामगारांनी मुंबई स्वच्छ राखण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांची ही कर्तव्यबद्धता कायम रहावी, अशी विनम्र अपेक्षाही व्यक्त करीत या कामगारांचे मुख्यमंत्री महोदयांनी कौतुक केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in