बेस्टला वाचविण्यासाठी मुंबईकरांनीच आवाज उठवावा! कामगार नेते शशांक राव यांचे आवाहन

राज्य सरकारच नव्हे, तर महापालिकेनेही पाठ फिरवल्याने अडचणीत आलेल्या बेस्टला वाचविण्यासाठी आता मुंबईकरांनीच एकत्र येऊन आवाज उठवावा, असे आवाहन बेस्ट कामगार नेते शशांक राव यांनी आज केले. दैनिक नवशक्तिच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
कामगार नेते शशांक राव
कामगार नेते शशांक रावविजय गोहिल
Published on

मुंबई : राज्य सरकारच नव्हे, तर महापालिकेनेही पाठ फिरवल्याने अडचणीत आलेल्या बेस्टला वाचविण्यासाठी आता मुंबईकरांनीच एकत्र येऊन आवाज उठवावा, असे आवाहन बेस्ट कामगार नेते शशांक राव यांनी आज केले. दैनिक नवशक्तिच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मुंबईतील तब्बल ३१ लाख प्रवाशांना दरदिवशी आपल्या इच्छितस्थळी सुरक्षित पोहचविणाऱ्या व मुंबईच्या प्रवासी वाहतुकीचा कणा असणाऱ्या ‘बेस्ट’ला वाचविण्याची मोहीम युनियनमार्फत हाती घेण्यात आली आहे. यासंदर्भातील पहिली बैठक गोरेगावात झाली असल्याचे सांगून ते म्हणाले, मागील सहा वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या बेस्टचे पुनरूज्जीवन करण्यासाठी कोणत्याही प्राधिकरणाने ठोस पुढाकार घेतलेला नाही. राज्य सरकार वा महापालिका प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळेच आम्ही मुंबईकरांच्या दरबारात जाऊन जनजागृती करण्याचे ठरविले आहे. मुंबईकरांना किफायतशीर दरात चांगली व दर्जेदार सेवा पुरविणे हाच मूळ उद्देश असला तरी त्याचा महापालिका प्रशासनाला सोयीस्कर विसर पडला असल्याचे त्यांनी नमूद केले.

बेस्ट बसची सेवा सुरळीत चालावी यासाठी बेस्टच्या ताफ्यात एकूण ३३३७ बसेस‌ची गरज आहे. त्यापैकी १०८५ बसेस बेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत. त्यापैकी ७६१ बसेस ३१ मार्च २०२५ रोजीपर्यंत भंगारात जाणार आहेत. त्यानंतर बेस्टच्या बसेसची संख्या आणखी घटणार आहे. त्यामुळे बेस्टसाठी नव्या बसेस टप्प्याटप्याने खरेदी करून प्रवासी सेवेत आणणे व त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासगी बसच्या परिचालनावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. खासगी बसेसची नियमित देखभाल दुरूस्तीही होत नसल्याचे ते म्हणाले.

  • १०८५ स्वत:च्या बसेस‌

  • ३१ मार्च २०२५ रोजी ७६१ बसेस भंगारात जाणार

  • ३१ लाख दरदिवशीचे प्रवासी

  • ४०-४५ हजार कोटीच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी काहीच नाही

  • बेस्टला वाचविण्याचा एकच पर्याय तो म्हणजे नव्या बसेस खरेदी करणे

logo
marathi.freepressjournal.in