चिकुनगुनिया, न्यूमोनियाने मुंबईकर त्रस्त; तीन वर्षात चाळीस टक्क्यांनी वाढ

गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे पालिका क्षेत्रात न्यूमोनिया, चिकनगुनिया आणि विषाणूजन्य आजारामध्ये वाढ होत आहे.
चिकुनगुनिया, न्यूमोनियाने मुंबईकर त्रस्त; तीन वर्षात चाळीस टक्क्यांनी वाढ
Published on

मुंबई : गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे पालिका क्षेत्रात न्यूमोनिया, चिकनगुनिया आणि विषाणूजन्य आजारामध्ये वाढ होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सदर परिस्थिती उद्भवली असल्याचा निश्कर्ष राज्य आरोग्य खात्याने काढला आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यामुळे एकीकडे मुंबईकरांचे आरोग्य हित लक्षात घेऊन प्रदूषित ठिकाणाचे बांधकाम बंद करणारे महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पालिकेचा आरोग्य विभाग मुंबईकरांच्या आरोग्याबाबत किती गंभीर आहे, हे यानिमित्ताने समोर आले आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, नागपूर आणि पुण्यानंतर मुंबईत सर्वाधिक चिकुनगुनियाचे रुग्ण आहेत. पालिका रुग्णालयात १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत तब्बल ७३५ रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या कामचुकारपणामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दोन रुग्णांना नाहक जीवाला मुकावे लागत आहे, असे मत राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या गंभीर परिस्थितीत पालिकेचे आरोग्य विभाग किती गंभीर आहे हे यानिमित्ताने समोर आले आहे.

चिकनगुनियाचा वाढता आलेख

२०२२ मध्ये चिकुनगुनियाचे १८ रुग्ण मुंबईत आढळले होते. २०२३ मध्ये ही संख्या २५० पर्यंत वाढली होती. मात्र. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत ४८५ अधिक प्रकरणांची नोंद झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

पालिका अधिकारी गंभीर नाही

पालिकेच्या कक्ष आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांच्याशी मागील दोन दिवसांपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी सह आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी सदर विभागाची माहिती त्यांचे सहकारी डॉ. वल्लेपवार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. तर वल्लेपवार यांनी याबाबत आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांच्याशी संपर्क साधण्यास सांगून सदर विषयाला पूर्णविराम दिला.

logo
marathi.freepressjournal.in