
दर्जेदार व टिकाऊ रस्ते मुंबईकरांना मिळावे यासाठी भविष्यात सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यावर भर दिला जात आहे. मुंबईतील तब्बल ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात येत असून या कामासाठी तब्बल ५ हजार ८०० कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. पुढील दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त करण्याचे उद्दिष्ट असून कामे सुरु असलेल्या रस्त्यांची माहिती 'क्यू आर कोड' उपलब्ध होणार आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होतील, अशी अपेक्षा पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केली.
महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्तेदेखील सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रीटीकरणाला वेग देण्यात आला आहे. कारण सिमेंट काँक्रीट रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीरक्षणाचा खर्च देखील कमी होतो. २०२२-२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण काम होत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित केले असून आणखी ४२३ किलोमीटर लांबीची कामे पुढील वर्षी हाती घेतली जातील, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी दिली होती.