मुंबईकरांची होणार वाहतूककोंडीतून सुटका; नवीन पूल बांधण्यासाठी पालिका ३५० कोटी खर्च करणार

अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत वाहन आणि रोज शेकडो नवीन वाहनांची भर यामुळे मुंबईतील वाहतूककोंडींचा सामना करावा लागतो.
मुंबईकरांची होणार वाहतूककोंडीतून सुटका; नवीन पूल बांधण्यासाठी पालिका ३५० कोटी खर्च करणार

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येत असून, पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी जुहू-वर्सोवा लिंक रोड (जेव्हीएलआर) आणि सी. डी. बर्फीवाला मार्ग, जेव्हीपीडी दरम्यान नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. हा उड्डाणपूल खुला झाल्यानंतर ४५ मिनिटांचे अंतर पाच मिनिटांत पार करणे शक्य होईल, असा विश्वास पूल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला. दरम्यान, या कामासाठी ३५० कोटींच्या निविदा मागवल्या आहेत.

अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत वाहन आणि रोज शेकडो नवीन वाहनांची भर यामुळे मुंबईतील वाहतूककोंडींचा सामना करावा लागतो. वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या पूल विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पूल बांधण्यासाठी अर्थसंकल्पात तब्बल १,५७६.६६ कोटींची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरात अंधेरी पश्चिमेला सी. डी. बर्फीवाला मार्ग, महापौर हॉल येथे १.६५ किमी अंतराचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. सध्याचा बर्फीवाला उड्डाणपूल जिथे संपतो, तिथून हा नवीन पूल सुरू होईल आणि जेव्हीएलआरवर बाळासाहेब सावंत मार्गावर उतरेल. विशेष म्हणजे, या पुलामुळे जेव्हीपीडी सर्कलवरील गर्दी कमी होईल. तसेच जुहू-वर्सोवा लिंक रोडपासून वर्सोवा येथील प्रस्तावित कोस्टल रोडपर्यंत वाहतुकीसाठी नवीन पर्याय उपलब्ध होईल. कोस्टल रोडवरून येणाऱ्या वाहनांना पश्चिम द्रुतगती महामार्गावर थेट प्रवेश मिळेल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्याने दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in