मुंबईकरांना जलसंकटातून मुक्तता मिळणार

गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने पाणीसाठयात वाढ होत आहे.
मुंबईकरांना जलसंकटातून मुक्तता मिळणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरु असल्याने पाण्याचा पातळीत वाढ होत आहे. विशेष म्हणजे एका दिवसांत ९७,६०७ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची नोंद झाली असून एका दिवसांत २५ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. मुंबईकरांची तहान भागेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाल्याने किमान नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुंबईकरांना जलसंकटातून मुक्तता मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने पाणीसाठयात वाढ होत आहे. त्यामुळे २७ जूनपासून मुंबईत लागू असलेली १० टक्के पाणीकपात ८ जुलैपासून रद्द केली असून पूर्वीप्रमाणे दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या सात तलावांत मिळून एकूण ५ लाख १५ हजार ७३६ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा असून गणित केल्यास हा पाणीसाठा पुढील १३३ दिवस पुरेल इतका आहे.

९ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावांत एकूण ४,१८,१२९ दशलक्ष लिटर (२८.८९ टक्के) इतका पाणीसाठा जमा होता. जो दररोज होत असलेल्या ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यानुसार पुढील १०८ दिवस पुरेल इतका म्हणजेच २४ ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका होता. मात्र २४ तासांत तलावांत खूप चांगला पाऊस पडल्याने एकाच दिवसांत तलावांतील पाणीसाठ्यात तब्बल ९७,६०७ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची म्हणजेच तब्बल २५ दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ एका दिवसांत झाली आहे. त्यामुळे सध्या तलावांत तब्बल ५,१५,७३६ दशलक्ष लिटर (३५.६३ टक्के ) पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा १९ नोव्हेंबरपर्यंत पुरेल, असे जलविभाग अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in