पाण्याच्या समस्येपासुन मुंबईकरांना दिलासा मिळणार

गेल्या २४ तासांत १७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठ्यात वाढ झाली
पाण्याच्या समस्येपासुन मुंबईकरांना दिलासा मिळणार

गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने धरण क्षेत्रात हजेरी लावली आहे. धरण क्षेत्रात संततधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात ५ दिवसांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत १७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठ्यात वाढ झाली असून सातही धरणात २९ जूनपर्यंत १ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. पावसाची संततधार सुरु असून पुढील एक ते दीड महिन्यांत मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

अप्पर वैतरणा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या तलावातील पाण्याची पातळी खालावत असल्याने २७ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होते आहे. शहराला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा तलावामध्ये २८ जूनला ५४ हजार ५०० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. हा साठा बुधवारी सकाळी ६९ हजार ८२९ दशलक्ष लिटरवर पोहचला आहे. अन्य तलावांच्या तुलनेत सर्वाधिक १५ हजार ३२९ दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ झाली आहे.मध्य वैतरणा तलावाच्या पाणीसाठ्यातही ३२० दशलक्ष लिटरपेक्षा वाढ झाली आहे. सन २०२१ च्या तुलनेत तलावातील पाणीसाठा सात टक्क्याने कमी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in