
मुंबई : मुंबईच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी, नागरी भागात दिवसेंदिवस पाण्याच्या मागणीत वाढ होत असून २०४१ पर्यंत अंदाजित लोकसंख्या १७.२४ दशलक्ष इतकी होण्याची शक्यता आहे. तर या सर्वांची तहान भागवण्यासाठी दररोज ६५३ कोटी लिटर पाण्याची मागणी असणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ऐन उन्हाळ्यात मुंबईकराना पाणीकपातीला सामोरे जावे लागते. २०४१ पर्यंत मुंबईची अंदाजित लोकसंख्या १ कोटी ७२ लाख (१७.२४ दशलक्ष) आणि पाण्याची मागणी दररोज ६५३ कोटी लिटर (अर्थात ६,५३५ दशलक्ष लीटर्स) इतकी असण्याची शक्यता आहे.
भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शासनाने मुंबईसाठी दिलेले गारगाई, पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प हे स्रोत विकसित करता येण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठ्यात प्रतिदिनी २,८९१ दशलक्ष लीटर्स इतकी वाढ होणार आहे. तर महानगरपालिकेने मनोरी येथे ४०० द.ल.ली. प्रतिदिन पर्यंत विस्तार क्षमता असलेल्या, २०० द.ल.ली. प्रतिदिन निःक्षारीकरण प्रकल्प लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्याचे जलस्रोतांची क्षमता
विहार ९ कोटी लिटर (९० द.ल.ली. प्रतिदिन)
तुळशी १.८ लिटर (१८ द.ल.ली. प्रतिदिन)
तानसा ५० कोटी लिटर (५०० द.ल.ली. प्रतिदिन),
मोडक सागर (वैतरणा) ४५.५ कोटी लिटर (४५५ द.ल.ली. प्रतिदिन),
उर्ध्व वैतरणा ६४ कोटी लिटर (६४० द.ल.ली. प्रतिदिन),
मध्य वैतरणा ४५.५ कोटी लिटर (४५५ द.ल.ली. प्रतिदिन) आणि
भातसा २०२ कोटी लिटर (२०२० द.ल.ली. प्रतिदिन) या सात
जलस्रोतांद्वारे ४०० कोटी लिटर (४००० द.ल.ली. प्रतिदिन)
भविष्यातील गरज भागविण्यासाठीचे प्रकल्प
गारगाई
(४४० दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी)
पिंजाळ
(८६५ दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी)
दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प
(१,५८६ दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी)